|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शनिवार पेठेतील अतिक्रमण पालिकेने हटवले

शनिवार पेठेतील अतिक्रमण पालिकेने हटवले 

प्रतिनिधी / कराड

येथील शनिवार पेठेतील मधुकर बजरंग रैनाक यांनी घर बांधताना केलेले वाढीव बांधकाम अतिक्रमण असल्याने नगरपालिकेने मंगळवारी ते पोलीस बंदोबस्तात पाडले.

मधुकर रैनाक यांना शनिवार पेठेत सिटी सर्व्हे नंबर 114 मध्ये घर बांधण्यासाठी 2016 मध्ये नगरपालिकेने बांधकाम परवाना दिला होता. त्यावेळी त्यांनी वाढीव 100 स्क्वेअर फूट बांधकाम केले होते. सदरचे वाढीव बांधकाम अतिक्रमण असल्याने त्याबाबत पालिकेकडे तक्रार झाली होती. त्यानंतर नगरपालिकेने सदरचे अतिक्रमण हटवण्याबाबत रैनाक यांना नोटीस बजावली होती.

दरम्यान, आशिष रैनाक यांनी हे बांधकाम पाडू नये, यासाठी नगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता. याच कारणावरून गतवेळच्या स्वातंत्र्यदिनी नगरपालिकेत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी तडजोड करण्याचेही प्रयत्न झाले होते. त्यानंतर पालिकेने मंगळवारी सकाळी हे अतिक्रमण हटवले.

पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव पथक शनिवार पेठेत दाखल झाले. ट्रक्टर, जेसीबीसह बांधकाम, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ए. आर. पवार, आर. डी. भालदार, रणजित पवार, अभय पांढरपट्टे, मिलिंद शिंदे आदी अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

अतिक्रमण पथकाचे अनोखे स्वागत

हे बांधकाम पाडण्यात येऊ नये, यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करणारे मनसे कार्यकर्ते आशिष रैनाक यांना सकाळी अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी रस्त्यावर रांगोळी काढून शांततेच्या मार्गाने पथकाचे स्वागत केले. फटाक्यांची माळ ते लावणार होते. मात्र ती पोलिसांनी काढून घेतली. सर्वसामान्य माणसाचे अतिक्रमण काढण्यासाठी तत्परता दाखवणाऱया नगरपालिकेने शहरातील अन्य अतिक्रमणे हटवण्याची तत्परताही दाखवावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Related posts: