|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाळूमाफिया महादेव साहुकार जेरबंद

वाळूमाफिया महादेव साहुकार जेरबंद 

विजापूर/वार्ताहर

 शार्पशूटर व वाळूमाफिया महादेव साहुकार (उमराणी, ता. इंडी) यांना मंगळवारी रात्री शिर्डी येथे जेरबंद करण्यात आले आहे. त्यांनी वाळूसाठा केलेल्या अड्डय़ावर आयजीपी अलोककुमार यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे 200 ट्रक वाळू, 4 ट्रक, 2 जेसीबी व 5 बोटी काही दिवसांपूर्वी जप्त करण्यात आल्या होत्या. तेंव्हापासून साहुकार फरारी झाला होता. अखेर त्याला पकडण्यात विजापूर पोलिसांना यश मिळाले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

महादेवर साहुकार गत अनेक वर्षांपासून शार्पशुटर व वाळू तस्करीमध्ये सक्रीय होता. तसेच चार दिवसापूर्वी आयजीपी अलोककुमार यांच्या नेतृत्त्वाखाली केरूर येथील एका शेतात सुमारे 200 ट्रक वाळूसाठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर महादेव साहुकार हा फरारी झाल्याने अलोककुमार यांनी जिल्हा पोलीसप्रमुख प्रकाश निकम यांना साहुकारला 24 तासात पकडा किंवा पीएसआय गोपाळ हळ्ळूर यांना निलंबित करा, अशी सूचना त्यांनी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून शिर्डीतून महादेव साहुकार यांना अटक करण्यात आली.

साहुकार समर्थकांवर पोलिसांचा लाठीमार

महादेव साहुकारला न्यायालयात हजर करण्यासाठी पीएसआय गोपाळ हळ्ळूर हे फौजफाटय़ासह जात होते. याची माहिती साहुकार यांच्या समर्थकांना मिळताच न्यायालयाबाहेर जमा होऊन साहुकार यांना सोडण्याची मागणी करत घोषणबाजी केली. यावेळी पोलिसांमध्ये व समर्थकांमध्ये वादावादी झाली. तसेच परिस्थिती आटोक्यात न आल्याने पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यातच साहुकार यांचे समर्थक शरणगौडा बिरादार यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला. न्यायालय आवारात साहुकार यांचे 5 हजार समर्थक जमा झाले होते. न्यायालयात हजर केल्यानंतर साहुकार यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. इंडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याची माहिती साहुकार यांनी दिली असून त्यांनी प्रचारही सुरू केला होता. त्यामुळे इंडी मतदारसंघात चूरस निर्माण होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता.