|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगाव-बेंगळूर विमानसेवा कायम राहणार

बेळगाव-बेंगळूर विमानसेवा कायम राहणार 

मंगळवार वगळता सहा दिवस सोय : 14 मे पर्यंत नियमीत सर्व सेवा

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगावच्या सांबरा विमानतळावरून स्पाईस जेटची विमानसेवा कायमस्वरूपी बंदच्या अफवेला आता पूर्णविराम मिळाला आहे. 14 मे नंतर हैदराबाद आणि चेन्नईची विमानसेवा बेंगळूरला हलविली जाणार असून त्यानंतर बेळगाव ते बेंगळूर ही विमानसेवा मंगळवार वगळता आठवडय़ाचे सहा दिवस कायम राहणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. 14 मे पर्यंत सर्व पाच विमानसेवा नियमीत असणार आहेत. तर बेळगाव-मुंबई विमानसेवेबद्दलचा निर्णय प्रतिक्षेत आहे.

उडान योजनेच्या कार्यवाहिनंतर हुबळी येथे वाढीव सुविधा मिळणार असल्याने स्पाईस जेट बेळगावच्या सर्व सेवा हुबळीला हलविणार, अशी बातमी पसरली होती. याबद्दल सर्वप्रथम बेळगाव सिटीझन कौंन्सिल या संस्थेने आवाज उठवल्यानंतर आता बेळगाव-बेंगळूरचे विमान धावणार, असे जाहिर करण्यात आले आहे. मंगळवार वगळता एसजी-3468 हे विमान दररोज दुपारी 3.55 वाजता बेळगावहून निघून सायंकाळी 5.15 वाजता बेंगळूरला पोहोचणार आहे. एसजी-3467 हे विमान दररोज दुपारी 2.15 वाजता बेंगळूर येथून निघून 3.35 वाजता बेळगावला पोहोचणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

हैदराबाद व चेन्नई वगळता किमान मुंबई व बेंगळूरसाठी विमानसेवा कायम ठेवावी ही बेळगावकरांची मागणी आहे. यापैकी बेंगळूरसाठीची मागणी पूर्ण झाली असून विमानसेवा बंद होणारच्या शक्यतेतील अर्धा विजय प्राप्त झाला आहे. सूत्रांकडून उपलब्ध माहितीनुसार लवकरच मुंबई विमानसेवेसंदर्भातील घोषणाही होणार आहे.

हुबळीवरून चेन्नई व हैदराबाद कनेक्शन

स्पाईस जेटने जाहिर केलेल्या माहितीनुसार हैदराबाद आणि  चेन्नईसाठी हुबळी येथून विमानसेवा उपलब्ध होणार आहे. रोज सकाळी 7.25 वाजता चेन्नई येथून निघणारे विमान सकाळी 9.05 वाजता हुबळीला येईल. सायंकाळी 7.30 वाजता हुबळी येथून निघून हे विमान रात्री 9.20 वाजता चेन्नईला पोहोचणार आहे. हैदराबाद येथून रोज सकाळी 10.15 वाजता निघणारे विमान सकाळी 11.25 वाजता हुबळीला पोहोचणार असून सकाळी 11.45 वाजता हुबळी येथून निघून दुपारी 12.55 वाजता ते हैदराबादला पोहोचणार आहे.

बेळगाव विमानतळावर वाढीव सुविधा उपलब्ध होईतोवर बेळगावच्या प्रवाशांनी हुबळी विमानतळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्पाईस जेटच्या मुख्य विक्री व महसूल अधिकारी शिल्पा भाटीया यांनी केले आहे.

Related posts: