|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ट्रक उलटून चालक जागीच ठार

ट्रक उलटून चालक जागीच ठार 

वार्ताहर/   सदलगा

सिमेंट मिक्सींग ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला. ही घटना 12 रोजी दुपारी सदलगा येथील दूधगंगा नदीवरील पुलानजीक घडली. महादेव वग्गन्नवर (ममदापूर ता. गोकाक) असे मृताचे नाव आहे.

 घटनेविषयी अधिक माहिती अशी, गुरुवारी दुपारी 2 वाजता बोरगावहून ट्रक क्रमांक केए 16 बी 7975 हा सदलग्याच्या दिशेने जात होता. या ट्रकमध्ये चालक एकटाच होता. सदलगा येथे पुलाजवळील वळणावर ट्रक येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रकची पुलाजवळील संरक्षण कठडय़ाला धडक बसली. त्यानंतर ट्रक पुलाजवळील भरावावरुन घसरत जाऊन सुमारे 60 फूट खाली उसाच्या फडात पलटी झाला. दरम्यान त्याचक्षणी चालक महादेव हा ट्रकमध्येच अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती सदलगा पोलीस ठाण्यास मिळताच उपनिरीक्षक एम. बी. बिरादार यांनी आपल्या सहकाऱयांसमवेत घटनास्थळी धाव घेऊन चालकाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करुन सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविला. घटनेची नोंद सदलगा पोलिसात झाली आहे.