|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘जेंडर’ म्हणून पाहाल तर, माणूसपण कधीच दिसणार नाही!

‘जेंडर’ म्हणून पाहाल तर, माणूसपण कधीच दिसणार नाही! 

बहुलिंगी समाजाच्या प्रतिनिधी दिशा शेख यांचे प्रतिपादन : ‘पाच दशक..’ पुस्तकाचे कणकवली येथे प्रकाशन

कणकवली:

‘कास्ट-जेंडर-क्लास’ या तीन गोष्टी एकमेकांच्या पायात पाय घालून चालत आल्या आहेत. जोपर्यंत आपण ‘नॉन जेंडर’ म्हणून एकमेकांकडे पाहत नाही, तोपर्यंत आपण माणूसपणाकडे कधीच जाणार नाही. आज सामाजिकस्तरावर शोषणाची प्रक्रिया गावकुसाच्या शेवटच्या माणसापर्यंत सुरू आहे. ही शोषण प्रक्रिया शेवटच्या घटकापासून खणली जात नाही, तोपर्यंत शोषण आणि शोषक हा संघर्ष सुरूच राहील, असे परखड मत ‘शब्दवेडी दिशा’ अर्थातच दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले.

‘ऐलमा पैलमा अक्षर देवा’ समूहातर्फे लेखिका वैशाली पंडित यांच्या ‘पाच दशक नऊ सुटे’ या पुस्तकाचे प्रकाशन बहुलिंगी समाजाच्या प्रतिनिधी तथा राज्यातील आघाडीच्या कवयित्री असलेल्या दिशा शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी दिशा यांनी, अनेक पालक हे मुलीला मुलासारखं वाढविल्याचे सांगतात. त्यापेक्षा मुलीला माणसासारखं वाढवा, असेही आवाहन त्यांनी केले.

…अन् स्त्रियांवर बंधने आली!

दिशा म्हणाल्या, शेतीच्या संशोधनासह चित्रकला, मूर्तिकला, संगीत, अलंकार, वस्त्रs, अन्न शिजवून खाण्याचा शोधही स्त्राrनेच लावला. म्हणूनच बहुतांश ठिकाणी ग्रामदेवता या स्त्रिया आहेत. निपुणपणाचे प्रतिक म्हणून या मूर्तींना अधिकचे हात दाखविले गेले असतील, तेव्हाची संस्कृती स्त्राrप्रधान होती. नर व मादी म्हणून नव्हे, तर निसर्गचक्राच्या पुनरुत्पादनासाठी एकमेकांना पूरक अशी माणसाची शरिरे होती. मात्र, स्त्राr ही आपल्या सहकाऱयाशिवाय बाळाला जन्माला घालू शकत नाही, हे पुरुषांना समजले आणि स्त्रियांवर बंधने आली.

…तरच समता प्रस्थापित होईल!

पुरुषी मानसिकता ही सत्तास्थानातून, शोषणातून येते. ती फक्त कमरेखालची नव्हे, तर डोक्यात असते. तर शोषण प्रक्रिया ही लैंगिक विषमतेतूनच येते. प्रत्येक वर्गातील बायकांचे त्या-त्या वर्गातील पुरुषांकडून शोषण झाले आहे. फक्त शोषणाचे प्रकार ‘अपडेटेड’ असतील. आजही रात्री उशिरा बायका बाहेर एकटय़ा जाऊ शकत नाहीत. स्त्रियांमध्ये ‘इक्वल’ बघण्याचा काळ येत नाही, तोपर्यंत समानता कधीच येणार नाही. महिला-पुरुष एकमेकांच्या यशाच्या सोबत गेले, तरच समता प्रस्थापित होईल, असे त्या म्हणाल्या.

स्त्रियांची मानसिकता ही पुरुष व्यवस्थेभोवतीच!

आपण भाषेतही लिंगभेद करतो. छोटी कळशी व मोठा हंडा, छोटी खुर्ची व मोठा सोफा, डोक्यावर फेटा व अंगावर साडी असे शब्दप्रयोग असतात. स्त्राrने कर्तृत्व गाजविल्यावर फेटा बांधतात. पण, पुरुषाने कर्तृत्व गाजविल्यावर त्याला साडी, बांगडय़ा घालतात का? याचा अर्थ स्त्रियांच्या साडी, बांगडीला दुय्यम स्थान आहे. बायकांची कामेही नेहमी दुय्यम समजली गेली. तर पुरुषी मानसिकतेने तो स्त्रियांना जबाबदारीत इतके गुंतवून ठेवतो, की तिला माणूस म्हणून जगायलाच मिळत नाही. प्रत्येक गोष्ट करताना ‘हय़ांना’ आवडेल का, याचा ती विचार करते. आमच्या सगळय़ा मानसिकता या पुरुषी व्यवस्थेभोवती फिरणाऱया ढोरासारख्या आहेत, असेही दिशा म्हणाल्या.

आता आपला इतिहास लिहावा लागेल!

इथला इतिहासही शिकाऱयानेच (पुरुषप्रधान संस्कृतीने) लिहिला. आता आपल्याला आपला इतिहास स्वतःलाच लिहावा लागणार आहे. इतिहासातील महान स्त्रियांची आपणालाच तपासणी करावी लागणार आहे. मगच आपणाला अस्तित्वाच्या खुणा सापडतील, असेही दिशा म्हणाल्या.

‘कंट्रोल’साठीच जात, धर्म, वर्ण!

पुरुष सत्तेचा तोटा स्त्रियांइतकाच पुरुषांनाही आहे. शेतकरी आत्महत्या पुरुषांच्याच होतात. कारण घर चालविणे ही पुरुषांची जबाबदारी. ते पूर्ण न करू शकणारा पुरुष स्वतःला कमी समजतो. जबाबदारीतूनच पुरुषांकडून घरांतील महिलांवर ‘कंट्रोल’ ठेवण्याचा प्रयत्न होतो. कारण तिच्याविषयीचे बरे-वाईट प्रश्न पुरुषालाच विचारले जातात. म्हणूनच स्त्रियांवर कंट्रोल मिळविण्यासाठीच जात, धर्म, वर्ण याची निर्मिती केली गेली. तर बायकांनाही गुलामीतून मिळालेली सुरक्षितता सोडवत नाही. वाघाने वाघिणीला तिच्या बछडय़ांसाठी शिकार करायला सांगितले नाही. फक्त स्त्राr-पुरुषांमध्येच बाई ही घटस्फोटानंतर पोटगी मागते. बायकांना स्वतःच्या हिमतीवर उभे राहण्याची संधीच व्यवस्थेने खेचून घेतली आहे. वास्तविक, बाळ जन्माला घालण्याचा निर्णय माझा असेल, तर त्याला सांभाळण्याची ताकदही माझ्यातच हवी, असेही त्या म्हणाल्या.

मी ‘डार्विन’ मानते!

त्या म्हणतात, प्रमाण कविता ज्याला मानले जाते, त्या कवितेचे कुठलेच मूल्य माझ्या कवितेत नाही. मी त्याला माझी व्यक्तता म्हणते. तर्क, तत्व व विज्ञान या तीन गोष्टींत एखादी गोष्ट बसत नसेल, तर त्या गोष्टी मी मानत नाही. म्हणून मला डार्विन मान्य आहे. मी दोन थडींवर पाय ठेवणार नाही. एका ठिकाणी विज्ञान व एका ठिकाणी दैववाद या दोघांचाही एकाचवेळी स्वीकार कधीच करणार नाही.

बाबासाहेब सर्वांचेच!

बाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट गटाची मक्तेदारी नाही. मात्र, विशिष्ट गटाने बाबासाहेबांना मोकळे सोडण्याचा प्रयत्न केला नाही व इतरांनीही त्या गटात घुसून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही. तर भारतातील डिजेंटराईड ग्रंथ म्हणजे संविधान आहे. कारण, तिथे स्त्राr पुरुष नव्हे, तर ‘व्यक्ती’ हा शब्द वापरला गेलाय.

‘तृतीयपंथी’ शब्द शोषण सांगणारा!

मी स्वतःला बहुलिंगी समाजाचा एक भाग समजते. कारण, तृतीयपंथी हा शब्द मुळातच शोषण सांगणारा आहे. आम्ही तिसरे आहोत, हे सांगितले जाते ते मला पटत नाही. पहिला, दुसरा, तिसरा कोण व कसे ठरवणार? तर तृतीयपंथी शब्दापेक्षा मला समूह सोडून वेगळी वाट शोधणारा ‘हिजडा’ शब्द जवळचा वाटतो. कारण तो मला बंडखोरी शिकवतो. तर रस्त्यावर टाळय़ा मारणारा हिजडा दिसला तर बायका, पुरुषांचे चेहरे तुच्छ प्राण्यांकडे बघावे, असे असतात. पुरुषाच्या शेजारी बसणे पसंत करणारी स्त्राrही माझ्या शेजारची सीटही बहुतांश वेळा रिकामी असते. ही सामाजिक अस्पृश्यता असल्याचेही दिशा म्हणाल्या.

म्हणूनच दिशा यांच्या हस्ते प्रकाशन : पंडित

 वैशाली पंडित यांनी ‘पाच दशक नऊ सुट्टे’ पुस्तकाविषयीचे अनुभव कथन केले. त्या म्हणाल्या, एकेकाळी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाला बहुलिंगी समाजातील लोकांनी हाताळले, तेव्हा मी घाबरले होते. त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाला आशीर्वाद दिला होता. आज माझा मुलगा संरक्षण खात्यात अधिकारी आहे. म्हणूनच आज या नव्या पुस्तकाला दिशा यांच्याच हस्ते पाळण्यात घालायचे मी ठरविले.

व्यासपीठावर कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता किर, कवयित्री नलिनी कुवळेकर, श्रीनिवास पंडित आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती तोरसकर, प्रास्ताविक अनुराधा दीक्षित यांनी केले. आभार सरिता पवार यांनी मानले.

Related posts: