|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबाचा तिसरा पाकाळणी सोहळा उत्साहात

‘चांगभलं’च्या गजरात जोतिबाचा तिसरा पाकाळणी सोहळा उत्साहात 

वार्ताहर/ जोतिबा डोंगर

‘जोतिबा’च्या नावानं चांगभलं’च्या गजरात जोतिबा डोंगरावर रविवारी तिसरा पाकाळणी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले. यानिमित्त श्रींस महाअभिषेक, महापोषाख, धार्मिक विधी, धुपारती सोहळा व पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.

यावेळी दख्खनचा राजा श्री जोतिबाची खडी राजेशाही आकर्षक, सुवर्णालंकारीत महापूजा बांधण्यात आली. ही पूजा दत्तात्रय नवाळे, दिनकर नवाळे, प्रकाश सांगळे, आनंदा नवाळे, सोमनाथ नवाळे, अनिल मिटके, मनिष मिटके यांनी बांधली. धार्मिक विधी व मंत्रोपच्चार केरबा उपाध्ये, प्रकाश उपाध्ये, कमलाकर उपाध्ये, बंडा उमराणी, शरद बुरांडे, विष्णू उपाध्ये यांनी केले.

दरम्यान पहाटे घंटानाद होवून श्रींच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी श्रींची पाद्यपुजा व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर 8 वाजता श्रींबरोबर नंदी, महादेव, चोपडाई देवी, काळभैरव, यमाई, रामलिंग, दत्त या देवांना अभिषेक घालून सुवर्णालंकारीत महापूजा बांधण्यात आली. त्यानंतर आरती करून महानैवेद्य दाखवून धुपारती सोहळा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

रात्री साडेआठ वाजता निघालेल्या पालखी सोहळय़ात उंट, घोडा, वाजंत्री, म्हालदार, चोपदार, देवसेवक, हुद्देवाले, ढोली, डवरी, कैचाळ वादक, पुजारी, देवस्थान समिती अधिकारी, सिंधीया समिती अधिकारी सहभागी झाले होते. पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी सदरेवर बसविण्यात आली. त्यानंतर डवरी गीते, ढोली यांचे झुलवे मानपान सोहळा झाल्यानंतर तोफेची सलामी होताच पालखी मंडपात आणण्यात आली. त्यानंतर उत्सवमूर्ती मंदिरात नेण्यात आली.

उद्या महाप्रसाद

तिसऱया पाकाळणी सोहळय़ानिमित्त व चैत्री यात्रेsची सांगता म्हणून मंगळवार 17 रोजी ग्रामस्थ, पुजारी यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Related posts: