|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बंद बंगला फोडून 17 तोळय़ाचे दागिने लांबवले

बंद बंगला फोडून 17 तोळय़ाचे दागिने लांबवले 

 

प्रतिनिधी/ सांगली 

  येथील जुना बुधगाव रस्त्यावरील विकासनगरमधील प्रदीप श्रीराम पाटील यांचा बंद बंगला फोडून चोरटय़ांनी 17 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. 40 हजाराच्या रोकडसह, महागडे घडय़ाळ व गॉगलही चोरटय़ांनी लंपास केला. शनिवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली.तर शंभर फुटी रोड आणि शामरावनगर परिसरातही तीन ठिकाणी चोरटयांनी दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. चोरटयांनी शहरात पुन्ह धुमाकूळ घातल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  याबाबत माहिती अशी, विकासनगर येथील प्रदीप पाटील मुंबईत स्टेट बँकेत नोकरीस आहेत. नोकरीनिमित्त ते मुंबईतच राहतात. त्यांची मुले परदेशात नोकरी करतात. सांगलीत केवळ त्यांची पत्नी राहते. त्याही 12 एप्रिल रोजी पतीकडे मुंबईला गेल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात चोरटय़ांनी त्यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरुममधील लाकडी कपाट उघडून त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील साडेसहा तोळ्याचे सोन्याचे गंठण, सात ग्रॅमचे मंगळसूत्र, नेकलेस, टॉप्स्, तोडे, दोन तोळ्याची चेन, सात अंगठय़ा, मोत्याचे सेठ, घडय़ाळ, गॉगल व 40 हजाराची रोकड असा साडेपाच लाखाचा ऐवज लंपास केला.

शनिवारी सायंकाळी प्रदीप पाटील यांचे बंधू दत्ताजीराव पाटील यांना बंगल्याचा दरवाजा थोडा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी पुढे जाऊन पाहिल्यानंतर कडी व कोयंडा तोडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी प्रदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. संजयनगर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांचा रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरु होता. तोपर्यंत पाटीलही मुंबईतून सांगलीत दाखल झाले. त्यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण केले होते. श्वान पाटील यांच्या बंगल्यापासून काही अंतरावर जाऊन घुटमळले. ठसे तज्ञांना महत्वाचे ठसे मिळविण्यात यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन 13 एप्रिल रोजी मध्यरात्री चोरी केल्याचा संशय आहे.संजयनगर पोलीसात याची नोंद झाली आहे.

  तर शामरावनगर स्वराज्य चौक येथील समृध्दी सराफ दुकान फोडण्याचा चोरटयांनी प्रयत्न केला. याशिवाय एक पानपट्टी आणि सायकल दुकानही फोडण्यात आले आहे. याची पोलीसात नोंद झाली नव्हती.

 

 

 

Related posts: