|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेडच्या रस्ते विकासावर फेरतेय ‘पाणी कनेक्शन’

खेडच्या रस्ते विकासावर फेरतेय ‘पाणी कनेक्शन’ 

वार्ताहर/ खेड

शहरातील नागरिकांसह वाहनचालकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील नगरप्रशासन कटिबद्ध असली तरी शहरातील रस्ते विकासाच्या परिपूर्तेसाठी हतबल असल्याचेच चित्र रविवारी सकाळी दिसून आले. शहरात रस्ता डांबरीकरणाचे काम जोमाने सुरू असतानाच अवघ्या 3 तासातच शिवाजीचौकशेजारी ‘नळ कनेक्शन’साठी खोदाई झाल्याने शहरातील रस्ते विकासावर ‘पाणी’ फेरल्याने  नागरिकांसह वाहनचालकांकडून नाराजीयुक्त संताप व्यक्त करण्यात आला.

शहरातील काही प्रभागातील वस्ती-वाडय़ांमधील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी नगरपरिषदेला वरिष्ठ पातळीवरून कोटय़वधी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेला हा निधी खर्ची टाकण्यासाठी गेल्या 4-5 दिवसापासून शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून उर्वरित काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामाच्या दर्जासाठी नगरपरिषदचे कर्मचारी व लोकप्रतिनिधी जातीनिशी ‘नजर’ ठेवून आहेत.

शहरातील नागरिकांसाठी पूर्वीच्या काळी बसवण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सद्यस्थितीत या रस्ते विकासावर एकप्रकारे ‘पाणी’च फेरत आहे.  ही पाईपलाईन रस्त्याशेजारी अथवा मधोमधच असल्याने एकप्रकारे ती डोकेदुःखीच ठरत चालली आहे. शहरात दिवसागणिक वाढती लोकवस्ती, इमारती यामुळे नगरपरिषदेकडे पिण्याच्या पाण्याच्या लाईनसाठी मोठी मागणी आहे. तसेच काही ग्राहकांच्या नळ कनेक्शनबाबतच्या अथवा पाईपलाईनला लागलेली गळती यासंदर्भातील तक्रारी होत असतात. या मागणीसाठी व तक्रारींच्या निवारणासाठी न.प.कडून पुरेपूर प्रयत्न केले जाते.

मात्र, त्यासाठी रस्त्यांच्या मधोमध खोदाई करून संबंधीत ग्राहकांना नवीन नळ कनेक्शन अथवा तक्रारींचे निवारण करावे लागत आहे. यामध्ये बाजारपेठ, शिवतररोड, डागबंगला परिसर, शिवाजीचौक, पोलीस स्थानक परिसर, एस.टी.स्थानक परिसर, महाडनाका परिसर आदी मुख्य रहदारीच्या ठिकाणी खोदाई होण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे. यामुळे याठिकाणाहून मार्गक्रमण करताना वाहनचालकांकसह पादचाऱयांना चांगलीच कसरत करावी लागते.

रविवारी सकाळी शिवाजीचौक ते वाणीपेठमार्गे बाजारपेठ असे रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या कामाला 3 तासांचा अवधी लोटतो न लोटतो तोच शिवाजीचौकनजीक ग्राहकाच्या मागणीनुसार न.प.च्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱयांना नवीन रस्ता डांबरीकरणावर खोदाई करून मागणी पूर्ण करावी लागली.  ही खोदाई सुरू असताना पादचाऱयांसह वाहनचालकांकडून नाराजीयुक्त संताप व्यक्त करण्याचे काम सुरू होते. याधर्तीवर शहरातील रस्ते विकासाला बाधा ठरणाऱया या ‘पाणी कनेक्शन’ समस्येवर नगरप्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढून शहरातील रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पादचाऱयांसह वाहनचालकांकडून केली जात आहे.

Related posts: