|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तरुणीचा गळा चिरून मृतदेह दिला फेकून

तरुणीचा गळा चिरून मृतदेह दिला फेकून 

प्रतिनिधी / वाई

मांढरदेव घाटात 28 वर्षीय तरूणीचा धारदार शस्त्रांनी गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. हल्लेखोरांनी खून करून मृतदेह शंभर फुट फरफटत नेऊन एका खोल वगळीत फेकुन दिला होता. गाढवेवाडीच्या ग्रामस्थांमुळे हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी पोलिसांना अद्याप कसलेही पुरावे हाती लागले नसल्याने  आरोपीला शोधणे वाई पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे. 

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, मांढरदेव घाटाच्या पायथ्याला पश्चिमेला असलेल्या गाढवेवाडील ग्रामस्थ दिलिप मानसिंग भिलारे व अन्य तीन तरुण गावाला घाट मार्गे होणाऱया पाणीपुरवठय़ाची फुटलेली पाईपलाईन पहाण्यासाठी रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मांढरदेव घाटातील माल पठार शिवारात पोहोचले. फुटलेल्या पाईपलाईनचा शोध घेत असताना भिलारे यांना मुख्य रस्त्यापासुन सुमारे दोनशे फुट अंतरावर एका वगळीत तरुणीचा मृतदेह आढळुन आला. भिलारे यांनी तत्काळ याबाबतची माहिती वाई पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलीस निरिक्षक विनायक वेताळ व त्यांचे सहकारी अर्ध्या तासात घटनास्थळी पोहचले. त्यानंतर ते मृतदेहाच्या जवळ गेले असता त्याना संबंधित युवतीचा गळा चिरून खून केल्याचे दिसुन आले.

पोलिसांनी आजुबाजुच्या परिसराची पहाणी केली असता शंभर फुट अंतरावर त्या युवतीचे रक्त सांडल्याचे आढळुन आले. हल्लेखोरांनी गळा चिरून खून केल्यानंतर  तरुणीचा मृतदेह फरफटत नेऊन तो वगळीत टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पोलिसांनी मृतदेह बाहेर काढुन पहाणी केली असता केवळ त्या तरुणीचा गळा चिरून मारल्याचे दिसून आले. शरीरावर अन्य ठिकाणी कुठेही जखमा नाहीत.  अंदाजे पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष वयोगटातील या तरुणीच्या डाव्या हातावर मेंहदी काढण्यात आली असुन मनगटावर बानु महमंद असं लिहिले आहे. तर करंगळीवरही मेंहदीने बानु लव्ह असं लिहिलं आहे. अंगावर गुलाबी रंगाचा नक्षी असलेला कुर्ता असुन निळय़ा रंगाचा सलवार घातलेला आहे. दोन्ही हातात हिरव्या  रंगाच्या प्रत्येकी सहा-सहा बांगडय़ा आहेत. गळय़ात पांढऱया रंगाची चेन असून त्यामध्ये असलेल्या लॉकेटमध्ये इंग्रजी पी अक्षर आहे. तरुणीच्या दोन्ही पायात पैंजण आहेत.

घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. मात्र ते केवळ शंभर फुट अंतरात घुटमळले. पोलिसांनी घटनास्थळी खुनात वापरण्यात आलेल्या हत्याराचा शोध घेतला मात्र ते मिळुन आले नाही. 

Related posts: