|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपा ‘फोंडा नागरिक समिती’चे उमेदवार जाहीर

भाजपा ‘फोंडा नागरिक समिती’चे उमेदवार जाहीर 

प्रतिनिधी/ फोंडा

स्थीर प्रशासन आणि अपूर्ण विकासकामांना चालन देणे हे भाजपा पुरस्कृत ‘फोंडा नागरिक समिती’चे प्राधन्य राहणार आहे. तसेच स्वच्छ व सुंदर फोंडा शहर या गोष्टींना जाहीरनाम्यात प्राधान्य देणार असल्याची घोषणा फोंडा नागरिक समितीचे समन्वयक सुनिल देसाई यांनी केली आहे. फोंडा पालिका निवडणुकीसाठी भाजपा पुरस्कृत फोंडा ‘नागरिक समिती’चे उमेदवार जाहीर केल्यानंतर ते बोलत होते.

एकूण पंधरापैकी चौदा प्रभागामधून हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी उपनराध्यक्ष शांताराम कोलवेकर, नगरसेवक आरविन सुवारीस, विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी, व्यंकटेश उर्फ दादा नाईक, सीताराम उर्फ दादी डांगी आदी उपस्थित होते. फोंडा पालिका क्षेत्रातील अपूर्ण राहिलेली विकासकामे पूर्ण करतानाच स्थीर प्रशासनाला फोंडा नागरिक समितीचे प्राधान्य राहणार असल्याचे सुनिल देसाई यांनी सांगितले. याशिवाय स्वच्छ व सुंदर फोंडा शहर, क्रीडा प्रकल्प, नियोजित पार्किंग व वाहतूक व्यवस्था, पर्यावरणपुरक विकास या विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरविन सुवारीस व शांताराम कोलवेकर यांनी नियोजित विकासकामांची माहिती दिली.

फोंडा शहरात मलनिस्सारण प्रकल्प व क्रांती मैदान प्रकल्पाला पालिका मंडळाने कधीच विरोध केला नव्हता. मात्र हे प्रकल्प उभारण्यापूर्वी पालिकेचा ना हरकत दाखला व पालिका मंडळाला विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकल्पांना हरकत घेतली होती. हे प्रकल्प हाती घेण्यापूर्वी जनसुनावणी घेणे आवश्यक होते, असे सुनिल देसाई यांनी स्पष्ट केले. स्वच्छ व सुंदर फोंडा शहर साकारण्यासाठी फोंडा पालिका क्षेत्रातील मतदारांनी नागरिक समितीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.