|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » देवी लईराईच्या हजारो धोंडगणांचे व्रत आजपासून

देवी लईराईच्या हजारो धोंडगणांचे व्रत आजपासून 

रविराज च्यारी / डिचोली

डिचोली तालुक्यातील शिरगाव येथील देवी लईराईचा प्रसिद्ध जत्रोत्सव 20 एप्रिल रोजी साजरा होणार असून जत्रोत्सवासाठी सर्वच पातळीवरून तयारीला वेग आला आहे. या जत्रेत देवीच्या प्रमुख देवकार्यात सहभागी होणाऱया गावातील 22 चौगुले मानकरी धोंडगणांच्या सोवळे व्रताला द्वादशीपासून सुरुवात झाली आहे, तर मनोभावे आपली सेवा रुजू करणाऱया देवीच्या हजारो धोंडगणांच्या सोवळे व्रताला आज सोमवारपासून प्रारंभ होत आहे. जत्रोत्सवानिमित्त संपूर्ण शिरगाव सजत असून बाजारपेठही विविध सामानाने फुलू लागली आहे. होमकुंडसाठी लाकडे येण्यासही प्रारंभ झाला आहे.

चौगुले मानकरी धोंडगणांचे व्रत सुरू

या प्रसिद्ध जत्रोत्सवात व पुढील चार दिवस संपन्न होणाऱया कौलोत्सवात देवीच्या प्रमुख देवकार्यात सहभागी होणाऱया गावातील 22 चौगुले धोंडगणांच्या सोवळे व्रताला द्वादशीपासून प्रारंभ झाला आहे. जत्रोत्सवापर्यंत म्हणजे 9 दिवस हे धेंडगण आपल्या घराच्या अंगणात वास्तव्य करतात. ब्राह्मणांच्या निवासस्थानी भोजन करून अत्यंत कडकपणे हे व्रत पाळले जाते. कोणत्याही आहाराचे सेवन करण्यापूर्वी या चौगुले धोंडगणांना स्नान करावेच लागते. आपल्या हातून या व्रतात कोणतीच चूक घडू नये यासाठी प्रत्येक धोंडगण कटाक्षाने लक्ष देत असतो. द्वादशी ते चतुर्थीपर्यंत ब्राह्मणांकडे भोजन करणारे हे सर्व धोंडगण पंचमीदिनी पूर्ण उपवास पाळतात. केवळ फराळ ग्रहण करतात व नंतर जत्रेचे पाचही दिवस उपवास सुरू असतो.

देवीचे 22 चौगुले धोंडगण

देवीच्या प्रमुख देवकार्यात सहभागी होणारे यदुवीर गावकर, दिनानाथ गावकर, सूर्यकांत गावकर, पुंडलिक गावकर, विष्णू गावकर, हिरु गावकर, बाबुली गावकर, नारायण गावकर, विठू गावकर, यदुवीर बी. गावकर, श्याम गावकर, लक्ष्मण गावकर, सोनू गावकर, संजय गावकर, गणेश ज. गावकर, गणेश पा. गावकर, अरुण गावकर, पंकज गावकर, यतेश गावकर, नितिन शेणवी शिरगावकर, रुपेश शेणवी शिरगावकर, प्रदीप वामन शिरगावकर हे 22 चौगुले धोंडगण कडक सोवळे व्रत पाळताना आपली सेवा रुजू करत आहेत.

हजारो धोंडगणांचे सोवळे व्रत आजपासून

लईराईच्या जत्रोत्सवात मोठय़ा संख्येने सहभागी होणाऱया धोंडगणांच्या श्रद्धेचे सोवळे व्रत आज सोमवारपासून सुरू होणार आहे. पाच दिवसांच्या व्रताला आजपासून प्रारंभ होणार आहे, तर तीन दिवसांच्या व्रताला धोंडगण बुधवारपासून प्रारंभ करणार आहेत. मोठा भक्तिभाव ठेवणारे देवीचे हे धोंडगण आपापल्या गावात, मंदिरात, नदीकिनारी किंवा पवित्र अशा पाण्याच्या ठिकाणी खास माडांच्या झावळांचा मंडप उभारून वास्तव्य करतात. या व्रतावेळी धेंडगण सर्व सामान नव्याने खरेदी करतात. वास्तव्यास असलेल्या ठिकाणी जाताना सर्व कपडे, सामान व बॅगसुद्धा पाण्याने भिजवतात. स्वतः आंघोळ करतात व नंतरच कामांमध्ये सहभागी होतात. अत्यंत कडकपणे पाळण्यात येणाऱया या सोवळय़ा व्रतावेळी सर्व कामे विभागून दिलेली असतात.

होमकुंडाची तयारी सुरू, शिरगाव सजू लागले

या जत्रोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या भव्य होमकुंडाची तयारी सुरू झाली आहे. मोठय़ा प्रमाणात लाकडे होमकुंडस्थळी दाखल झालेली आहेत. नवसाची फेड म्हणून होमकुंडाला लाकडाचे भारे भाविकांकडून येण्यास प्रारंभ झाला आहे. डोक्यावर लाकडाचे भारे घेऊन होमकुंडाला प्रादक्षिणा घालून भाविक आपल्या नवसाची फेड करतात. शिरगाव सध्या जत्रोत्सवाच्या तयारीत मग्न असून गाव सजविण्याच्या कामात प्रत्येकजण गुंतला आहे. सर्व घरांना रंगरंगोटी करण्याचे कामही सुरू आहे. प्रत्येकजण आपले घर रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवितो. संपूर्ण गावात साफसफाईच्या कामांनाही प्रारंभ झाला आहे.