|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रचाराचे 4.86 लाखाचे साहित्य जप्त

प्रचाराचे 4.86 लाखाचे साहित्य जप्त 

प्रतिनिधी/ निपाणी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आणण्यात येणारे प्रचारसाहित्य निवडणूक प्रशासन व पोलिसांनी जप्त केल्याची घटना रविवारी सकाळी 7 च्या सुमारास घडली. निवडणूक अधिकारी दीपक हरदी, सीपीआय मुताण्णा सरवगोळ, ग्रामीणचे फौजदार निंगनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत 4 लाख 86 हजार इतकी होत असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी, मुंबईहून बेंगळूरच्या दिशेने जाणारी वास्तविका टूर्स अँड ट्रव्हल्सची प्रवासी बस (एमएच 04 एचवाय 8090) ही रविवारी सकाळी 7 च्या सुमारास कोगनोळी येथे आली. यावेळी निवडणुकीसाठी येथे उभारण्यात आलेल्या तपास नाक्यावर सदर बसची तपासणी करण्यात आली. यावेळी बसमध्ये टोप्या व स्कार्पने भरलेली पोती आढळून आली. सदर साहित्य निवडणूक प्रचारासाठी नेण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. यामध्ये महिला एम्पॉवरमेंट पार्टीची चिन्हे असलेल्या सुमारे 30 हजारापेक्षा जास्त टोप्या तसेच भाजपचे चिन्ह असलेले 3 हजाराहून अधिक स्कार्प आढळून आले. या सर्व साहित्याची किंमत 4 लाख 86 हजार होत असल्याचे सांगण्यात आले. सदर सर्व साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी सदर ट्रव्हल्सचा चालक जितेंद्र पाटील (रा. हिटणी, ता. हुक्केरी) याला अटक करण्यात आली. यावेळी सदर ट्रव्हल्सही जप्त करण्यात आली. यानंतर प्रवाशांना दुसऱया बसने पाठविण्यात आले.

कोगनोळी तपास नाक्यावर सतर्कता

27 मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यापासूनच येथील कोगनोळी टोल नाक्यानजीक तपासनाका सुरू करून वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. तपासनाका उभारल्यानंतर आठवडाभरात दोन कारवायांमध्ये येथे सुमारे 30 लाखांची बेहिशोबी रोकड पकडण्यात आली. यानंतर आता येथे तिसरी मोठी कारवाई झाली आहे. निवडणूक प्रशासन तसेच पोलिसांच्या मदतीला आता सैन्यदलाची तुकडीही तैनात करण्यात आल्याने निवडणुकीदरम्यान गैरप्रकार करू इच्छिणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.

Related posts: