|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शेवरे स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा 22 रोजी कणकवलीत

शेवरे स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा 22 रोजी कणकवलीत 

ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते वितरण 

प्रतिनिधी / कणकवली:

सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग संस्थेतर्फे देण्यात येणारा कविवर्य आ. सो. शेवरे जीवन गौरव आणि कवी उत्तम पवार स्मृती ‘उत्तम सर्वोत्तम’ पुरस्कार वितरण सोहळा 22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता शहरातील नगर वाचनालय येथे    आयोजित करण्यात आला आहे. विख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. 

सम्यक साहित्य संसदेचे पुरस्कार घोषित करण्यात आले असून सम्यक साहित्य संसद संस्थेचे संस्थापक कविवर्य आ. सो. शेवरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा शेवरे जीवनगौरव पुरस्कार दलित पँथरचे नेते, लिटल मॅगझिन चळवळीतील प्रमुख, आंबेडकरवादी विचारवंत-भाष्यकार राजा ढाले यांना जाहीर करण्यात आला आहे. या संस्थेचे माजी अध्यक्ष उत्तम पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ‘उत्तम-सर्वोत्तम’ हा काव्य पुरस्कार अरुण इंगवले यांच्या ‘आबूट घेऱयातील सूर्य’ या कवितासंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकेर्ते डॉ. श्रीधर पवार यांना निमंत्रित करण्यात आले असून प्रा. सोमनाथ कदम, कवयित्री संध्या तांबे यांची उपस्थिती लाभणार आहे. या दोन्ही पुरस्कारांचे वितरण गज्वी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

गज्वी हे भारतीय पातळीवरील मराठी नाटककार असून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारे नाटककार म्हणूनच ते प्रख्यात आहेत. त्यांच्या ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेचे 14 हून अधिक भाषांत अनुवाद झाले आहेत. ‘किरवंत,’ ‘गांधी आणि आंबेडकर’ ही त्यांची गाजलेली नाटके असून सध्या ‘हवे पंख नवे’ हे नाटक चर्चेत आहे. कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील हेतकर व कार्यवाह सिद्धार्थ तांबे यांनी केले आहे.