|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » स्वामी असीमानंदसह सर्व आरोपी निर्दोष

स्वामी असीमानंदसह सर्व आरोपी निर्दोष 

हैदराबाद / वृत्तसंस्था

अकरा वर्षांपूर्वी गाजलेल्या मक्का मशीद स्फोट प्रकरणातील सर्व पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात स्वामी असीमानंद यांचाही समावेश आहे. सोमवारी हा निकाल विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश रविंदर रेड्डी यांनी घोषित केला. या निकालामुळे भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवादाचा आरोप करणाऱयांनाही जबर तडाखा बसला आहे.

देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, भरत मोहनलाल रतेश्वर आणि राजेंद्र चौधरी अशी निर्दोष सुटलेल्या इतर चार आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींविरोधात एकही पुरावा नाही. त्यामुळे त्यांना निर्दोष सोडण्यात येत आहे. कोणतीही कागदपत्रे किंवा साधी आरोपींना दोषी ठरविता येण्यासाठी पुरेशी नाहीत असे विशेष न्यायाधीशांनी निकालात स्पष्ट केले. त्यामुळे कारागृहात असलेल्या आरोपींची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. सध्या पाच पैकी तीन आरोपी कारागृहात आहेत. निकालाच्या अभ्यासानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली जाईल, असे एनआयएने म्हटले आहे.

स्फोटाची घटना

18 मे 2007 या दिवशी त्यावेळच्या संयुक्त आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद येथील मक्का मशीद येथे भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात 9 जण ठार तर 58 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर शहरात हिंसाचार झाला होता. तो रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते.

भगव्या दहशतवादाचा आरोप

या स्फोट म्हणजे हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद असल्याचे आरोप त्यावेळी केंद्रात सत्तेवर असणाऱया काही काँगेस नेत्यांनी केले होते. त्यामुळे या घटनेला धार्मिक रंग प्राप्त झाला होता. या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. नंतर 2011 मध्ये हा तपास सीबीआयकडून राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाकडे (एनआयए) हस्तांतरीत करण्यात आला होता. एनआयएने विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.

10 आरोपींची चौकशी

सीबीआयने याप्रकरणी प्रथम 10 आरोपींची चौकशी केली होती. तथापि, नंतर केवळ पाच जणांविरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले. त्यात स्वामी असीमानंद तथा नबकुमार सरकार यांचा समावेश होता. 2017 मध्ये असीमानंद आणि भरत रतेश्वर यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. आणखी दोन आरोपी संदीप डांगे व रामचंद्र कलसांग्रा हे फरार असून सुनील जोशी यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आरोपी निर्दोष सुटल्याने बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ही न्यायाची क्रूर चेष्टा

सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता ही न्यायाची चेष्टा आहे, असा आरोप एआयएमआयएम या पक्षाचे नेते असदुद्दिन ओवैसी यांनी केला आहे. एनआयए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या अन्यायाला जबाबदार आहेत. अनेक साक्षीदारांनी आपल्या साक्षी फिरविल्याने संशय निर्माण झाला आहे. एनआयए हा मोदी सरकारच्या हातातील अंधळा आणि बहिरा पोपट आहे असे वक्तव्य त्यांनी केले.

निकालानंतर न्यायाधीशाचा राजीनामा

हा निकाल दिल्यानंतर सात तासांनी न्यायाधीश देविंदर रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी राजीनामा आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या राजीनाम्यात काहीतरी काळेबेरे आहे, असा आरोप ओवैसी यांनी केला.