|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दुसऱयांदा चिकोडीचे नाव सातासमुद्रापार पोहोचणार

दुसऱयांदा चिकोडीचे नाव सातासमुद्रापार पोहोचणार 

प्रा. उत्तम शिंदे/   चिकोडी

सातासमुद्रापार लाखो चाहत्यांच्या हृदय पटलावर संगीताची धून साकारलेल्या चिकोडी येथील श्रेणिक संजय माने या युवकाचा नेव्हर सिन दॅट गर्ल हा अल्बम बुधवारी सकाळी 11 वाजता श्रेणिक या ऑफिसीयल युटय़ुबवर प्रदर्शित होणार आहे. या अल्बममधील गीत, संगीत, गायक व कंपोजर हे सर्व श्रेणिक यानेच केले आहे. यापूर्वीच्या त्याच्या रियलगाय या टीझर ट्रेलरला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व अमेरिका येथील विविध टेलिफिल्म निर्मात्यांसह अनेक कंपन्यांनी व्यासपीठ निर्माण करुन देण्याचे निमंत्रण दिले होते. पण त्याला नकार देऊन श्रेणिक याने मायदेशीच राहण्याचा निर्णय घेतला. आता त्याचा दुसरा नेव्हर सिन दॅट गर्ल हा टीझर ट्रेलर आज बुधवारी प्रदर्शित होत असून पुन्हा एकदा चिकोडीच्या इंदिरा नगरच्या या युवकाने भारतातच नव्हे तर इतर अनेक देशात गायन क्षेत्रात गरुढझेप घेतली आहे. त्याच्या या दुसऱया टीझर ट्रेलरची अनेक चाहते वाट पाहत होते. आता हा ट्रेलर प्रदर्शित होत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जस्टीन बिबरच्या गीतामुळे प्रेरित

12 वी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या संगीतची आवड असलेल्या श्रेणिकला वयाच्या तेराव्या वर्षी वर्ग मित्राने जस्टीन बिबर या गयात गायकाचे गाणे ऐकावयास दिले. ते गाणे ऐकल्यानंतर आपणही अशी गाणी का लिहू नयेत असा विचार डोक्यात आला व लागलीच गाणी लिहिण्याचा छंद जडला. त्यानंतर गायनाचाही सराव केला.  व आपल्या हायस्कूल जीवनापासून आंग्ल भाषेतील गाणी गाण्यास प्रारंभ केला. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात चांगलाच प्रतिसाद मिळाला. वर्गमित्रांच्या आग्रहाखातर त्याने स्टेजवर शो करण्यास प्रारंभ केला. महाविद्यालयीन जीवनात अनेक पदके व पारितोषिके मिळाली. महाविद्यायीन शिक्षण घेत असताना बारावीनंतर एमबीबीएस करण्याचा पालकांचा हट्ट होता पण तो खर्च परवडणारा नव्हता म्हणून श्रेणिकने संगीत क्षेत्रातच आपले करियर घडविण्याचे ठरविले व आपले मत वडिलांसमोर व्यक्त केले. वडिलांनी त्यास मान्यता दिली. मान्यता मिळताच श्रेणिकने थेट बेंगळूर गाठले. तेथे गेल्यानंतर विजयकृष्णा या संगीत निर्देशकाच्या मार्गदर्शनाखाली आपली क्षमता सिद्ध केली. यावेळी त्याने आपले एक गाणे टय़ुनसहीत गायिले. त्याचे हे कौशल्य पाहून श्रेणिक हा एक महान कलाकार होईल, या आशयाने विजयकृष्णा यांनी त्याला आपल्याकडेच ठेऊन प्रोत्साहन दिले.

गीतकार, संगीतकार, गायक व अभिनय

केवळ 2-3 वर्षाच्या कालावधीत आपल्या साथीदारांच्या सहकार्याने कोणतेही पूर्व प्रशिक्षण नसताना श्रेणिक माने याने नेव्हा सिन दॅट गर्ल, प्ले बॉय, रिअल गाय अशी एकापेक्षा एक गाणी स्वत:च कंपोझ करुन त्याला लागणारी संगीताचा धून ही स्वत:च दिली व स्वत:च्या सुमधूर आवाजात ही गाणी गायीली. बेंगळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये, तसेच बेंगळूरच्या नॅशनल ग्राऊंडवर व प्रगती सॉप्टवेअर कंपनीच्या वार्षिक सभेच्या कार्यक्रमात श्रेणिक माने यांने लांकांना आपल्या चौफेर अदाकारीने मंत्रमुग्ध करुन सोडले.