|Monday, July 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्रवीण तोगडियांचे उपोषण समाप्त

प्रवीण तोगडियांचे उपोषण समाप्त 

अहमदाबाद / वृत्तसंस्था :

विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी गुरुवारी स्वतःचे बेमुदत उपोषण संपुष्टात आणले आहे. तोगडिया यांनी राम मंदिर उभारणीच्या मागणीवरून उपोषण चालविले होते. उपोषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती.

संतांच्या सल्ल्यानुसार माझे उपोषण संपुष्टात आणले आहे. आता हिंदूंच्या हिताकरता भारतभ्रमण करणार आहे. राम मंदिर, गो-तस्करी, समान नागरिक कायदा, काश्मिरी हिंदू आणि बांगलादेशी स्थलांतरितांचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचा दावा तोगडिया यांनी केला.

शिवसेनेचे समर्थन

या अगोदर तोगडियांना समर्थन देण्यासाठी शिवसेनेचे 20 सदस्यीय शिष्टमंडळ राजस्थानात दाखल झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिल्याचा दावा तोगडियांनी बुधवारी केला होता. सीमेवर सैनिक सुरक्षित नाहीत, देशात शेतकरी आत्महत्या करत आहेत. आमच्या घरांमध्ये मुली सुरक्षित नसताना पंतप्रधान विदेश दौऱयावर गेल्याची टीका तोगडिया यांनी केली होती.

निवडणुकीत पराभव

तोगडिया 32 वर्षांपर्यंत विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. नव्या कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने तोगडिया यांनी संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. तोगडिया यांच्या समर्थकांचा विहिंपच्या अंतर्गत निवडणुकीत पराभव झाला आहे. एस. कोकजे हे विहिंपचे नवे अध्यक्ष झाले आहेत.