|Saturday, March 23, 2019
You are here: Home » क्रिडा » ख्रिस गेलचा झंझावात, सनरायजर्स भुईसपाट!

ख्रिस गेलचा झंझावात, सनरायजर्स भुईसपाट! 

वृत्तसंस्था /मोहाली :

क्रिकेट जगतातील कॅरेबियन महासम्राट ख्रिस गेलने अवघ्या 63 चेंडूत 104 धावांची आतषबाजी केल्यानंतर पंजाब किंग्स इलेव्हनने आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादची विजयी मालिका अखेर खंडित केली. गेलच्या झंझावातामुळे पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 193 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात सनरायजर्स हैदराबादला निर्धारित 20 षटकात 4 बाद 178 धावांवर समाधान मानावे लागले. गेलच्या खेळीतील 11 उत्तूंग षटकार हे या लढतीचे ठळक वैशिष्टय़ ठरले.

प्रारंभी, ख्रिस गेलने रशीद खानच्या डावातील 14 व्या एकाच षटकात तब्बल 4 षटकारांसह 26 धावा वसूल करत विस्फोटकतेचा पहिला दाखला दिला. या एकाच षटकात त्याने 4 उत्तूंग षटकार खेचले व नंतर 2 एकेरी धावा घेतल्या. या षटकात पंजाबने 27 धावा वसूल केल्या. 37 वर्षीय या उंचापुऱया फलंदाजाने पॉवरप्लेमध्ये काही चेंडूंना जरुर आदर दाखवला असेल. पण, त्याचवेळी पट्टय़ात सापडलेल्या चेंडूंना उत्तूंग पिटाळण्यात त्याने अजिबात कसर सोडली नाही. 11 षटकारांसह त्याने आयपीएलमधील पाचवे शतक साजरे केले.

वास्तविक, हैदराबादने पॉवर प्ले षटकात उत्तम सुरुवात केली होती. त्यामुळे, पंजाबचा संघ 160 ते 170 धावांपर्यंत पोहोचू शकेल, असे संकेत होते. पण, 14 व्या षटकात ख्रिस गेलने 4 उत्तूंग षटकार फटकावले व या लढतीचा नूरच पालटून टाकला. रशिदच्या डावातील पाचव्या षटकात पहिल्या चेंडूवर ख्रिस गेलचा अंदाज चुकला होता. पण, त्यावेळी वृद्धिमान साहाकडून चूक झाली आणि गेल बचावला. त्यानंतर मात्र विंडीजच्या या तगडय़ा फलंदाजाने हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

ख्रिस गेलने उत्तूंग फटके लगावतानाच स्ट्राईक रोटेट करण्यावरही उत्तम भर दिला. उत्तम रनिंग बिटविन द विकेट, हे देखील त्याच्या खेळीचे ठळक वैशिष्टय़ ठरले. अनेक एकेरी धावा घेतल्या असल्या तरी 11 उत्तूंग षटकारामुळे त्याचा स्ट्राईक रेट 165.07 च्या घरात पोहोचला. आरसीबीने या हंगामात ख्रिस गेलकडे कानाडोळा केला असला तरी आपणच ‘युनिव्हर्स बॉस’ आहे, हे जणू त्याने येथे दाखवून दिले. हैदराबादचा स्टार गोलंदाज भुवनेश्वरही गेलचा फटका बसलाच. भुवीला षटकार खेचत ख्रिस गेल 99 धावांवर पोहोचला आणि नंतर लवकरच त्याने तडफदार शतकही साजरे केले. गेलच्या या स्फोटक खेळीमुळे हैदराबादला येथे संधी नसेल, हे देखील त्याचवेळी जवळपास निश्चित झाले होते.

प्रत्युत्तरात हैदराबादतर्फे कर्णधार केन विल्यम्सन (41 चेंडूत 54) व मनीष पांडे (42 चेंडूत नाबाद 57) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. पण, त्यांचे प्रयत्न हैदराबादला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

Related posts: