|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सत्य, निःशब्द आणि दुखंडे

सत्य, निःशब्द आणि दुखंडे 

महाराष्ट्राला व्याख्यानमालेची मोठी परंपरा असताना आता व्याख्यानमाला कालबाहय़ झाली असे सगळीकडे चित्र असतानाच्या काळात सावंतवाडीत दुखंडे व्याख्यानमाला सुरू झाली आहे ही सकारात्मक गोष्ट आहे. याच विचाराने कणकवलीतही तशी व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. ही फक्त एक सांस्कृतिक घटना नाही तर तो या काळातला महत्त्वाचा सांस्कृतिक राजकीय हस्तक्षेपच आहे.

.असे म्हणतात की सत्य हे नागवे असते आणि त्याचा पाठपुरावा करण्याऱया, त्याची सत्यता तपासणाऱया माणसाला तत्त्चनिष्ठच राहावे लागते, आयुष्य पणाला लावावे लागते. मात्र दुसऱया बाजूला सत्याला घाबरणारा वर्ग निःशब्द असतो. तो नाईलाजाने मुक्यानेच जगणे जगत राहतो. मग अशा वर्गावर होणाऱया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सत्याचा शोध घेणारा सतत कार्यरत राहतो. ज्येष्ठ समाजवादी साथी प्रा.गोपाळराव दुखंडे यांनी आपली पुरी हयात अशा मुक्या-निःशब्द वर्गासाठीच घालवली. आता ‘जेवढे खोटे बोलाल तेवढे सत्य वाटण्याची शक्यता’ असणाऱया या काळात त्यांच्या स्मरणार्थ सावंतवाडीतील त्यांच्या साथींनी सत्यशोधक व्याख्यानमाला या वर्षीपासून सुरू केली. भारतीय समाज सर्वांधिक दुभंगत जाण्याच्या या काळातील ही व्याख्यानमाला म्हणजे अपवादात्मक उपक्रम सोडून कोकणच्या परंपरावादी उपक्रमातील महत्त्वपूर्ण हस्तक्षेपच ठरावा!

सगळय़ात महत्त्वाचे असते ते म्हणजे समाज कोणाबरोबर जातो आणि कोणत्या विचाराला स्वीकारतो. त्यावरच समाजाचे प्रागतिक भवितव्य अवलंबून असते. मूलगामी विचाराची शृंखला वाढविण्यासाठी आधी आपल्या डोक्यातील परंपरेची जळमटे बाजूला काढावी लागतात. प्रा. दुखंडे तरुणाईच्या मेंदूतील अशी जळमटे काढण्याचा सतत प्रयत्न करत असत. अर्थात मुंबईसह कोकणातील ज्यांनी उगा ‘स्व’ दुराभिमान बाळगला अशी तरुणाई त्यांच्यापासून दूर गेली. पण त्यांच्या स्पष्ट स्वभावाला सहन करत त्यांच्या चळवळीचे जे साथी झाले ते मात्र त्यांच्यासोबत कायमच कार्यरत राहिले. अर्थात अशी कार्यरताच त्या त्या काळात महत्त्वाची असते. तोच पुढच्या काळाचा खरा चेहरा असतो, त्यालाच गती देण्याचे काम गेल्या अनेक वर्षात दुखंडे यांनी केल्याने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित करण्यात येणाऱया सत्यशोधक व्याख्यानमालेला विशेष महत्त्व आहे. विशेषतः या व्याख्यानमालेचे उद्घाटन राजकीय पुरस्कृत आजच्या आभासी वातावरणाला बळी पडणाऱयांची मानसिकता बदलण्यासाठी देशभर सतत कार्यरत राहणाऱया विख्यात भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते झाले, यातून व्याख्यानमालेचा उद्देश सत्यशोधकीच असल्याचे स्पष्ट होत आहे. सत्य पचवणे जसे कठीण असते तसेच सत्य सांगायलाही कमालीचे धाडस लागते. यासाठी आधी आपल्यातील ‘स्व’ ला विसरावे लागते. ते विसरण्यासाठी मनातील लौकिक अभिलाषेचा लवलेशही गळून पडावा लागतो. कलावंतांची भूमिका महत्त्वाची असते. पण काहीतरी लाभाचा हेतू ठेवून जेव्हा सामाजिक ‘भूमिका बिमिका’ घेतली जाते तेव्हा त्यातून अशी भूमिका घेणाऱयांची कधी ना कधी फसवणूक होत असतेच, परंतु त्याहीपेक्षा अशी कृती म्हणजे खोटे आभासी वातावरण निर्माण करून खोटय़ालाच सत्य मानायला लावणाऱया विकृतीलाच उत्तेजन देणे होय! दुखंडे मात्र ‘मी लाभार्थी’ या अर्थाने कधीच कार्यरत राहिले नाहीत.

उलट त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा अनेकांनी लाभ उठविण्याचा प्रयत्न केला. तरीही ते इतरांना न्याय देण्यासाठी झगडत राहिले आणि आयुष्याच्या कोणत्याही वळणावर त्यांनी सत्याचाच स्वीकार केला. खरेतर डॉ. देवी यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, सत्य सांगायचे असेल तर शब्द हा एकमेव आवाज आहे. प्रा. दुखंडे यांच्याही सोबतीला कायम शब्दच होते. त्यांनी समाजातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कायम शब्दांचाच आवाज मोठा केला. शब्द हेच शस्त्र मानले. त्यामुळेच त्यांचे साथी म्हणून कार्यरत राहिलेले आणि नंतर पुढे प्रत्यक्षातल्या राजकारणात मोठे झालेले अनेकजण दुखंडेंपासून दूर राहण्यातच सुख मानायचे. कारण दुखंडे अशा लोकांमधील सामाजिक दुजाभाव शोधायचे आणि दुखंडे ‘आपल्या भाषेत’ त्यांना त्यांच्या पूर्व आयुष्याचे (विचारधारेचे) स्मरण करून द्यायचे. दुखंडे यांचे कार्यक्षेत्र मुंबई होते तरीही ते तळकोकणातील तरुणाईशी आपले नाते जपून होते. यामुळेच निवृत्तीनंतर त्यांनी कोकणात समाजासाठी कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना आपल्या सोबतीसाठी याच तरुणाईचा आधार वाटत राहिला. गेल्या दहा वर्षात कोकणची शांतताच नाहीशी केली त्या मायनिंग, जैतापूरच्या प्रकल्पाची बत्तीच विझावी म्हणून त्यांनी याच तरुणाईबरोबर संघर्ष केला. त्यांनी नेहमीच सगळी प्रलोभने झुगारून सरळ बघण्याचे धारिष्ठय़ दाखवले आणि आताचा काळ तर उजवीकडेच बघा नाही तर तुम्ही देशद्रोहीच असा असतानाच्या काळात त्यांच्या नावाने सत्यशोधकी व्याख्यानमाला सुरू करण्यात
आली.

महाराष्ट्राला व्याख्यानमालेची मोठी परंपरा असताना आता व्याख्यानमाला कालबाहय़ झाली असे सगळीकडे चित्र असतानाच्या काळात दुखंडे व्याख्यानमाला सुरू झाली आहे ही सकारात्मक गोष्ट आहे. प्रबोधनाची कोणतीही चळवळ कालबाहय़ होत नसते. कालबाहय़ होत असतात ती अशा चळवळीकडे विचाराच्या दृष्टीने न बघणारी संधीसाधू मने. माणसाला सामाजिक स्तरावर वाचाहीन बनवले जाते तेव्हा तेव्हा अशा प्रबोधनाची गरज असते आणि असे प्रबोधन त्या काळाची गरज ओळखून स्वतःमधील छोटे छोटे मतभेद विसरून एकत्र येत चालू ठेवायचे असते. सत्य किती कटू असते आणि ते पचवताही येत नाही असा हा आजचा काळ आहे. एका बाजूला गो पालक स्वतःला म्हणवून घ्यायचे आणि दुसऱया बाजूला आपल्याच माता-बहिणी समान असणाऱया स्त्रियांना छळायचे हे सूडसत्र न थांबण्यासाठी त्याला पुन्हा धर्मांचा मुलामा द्यायचा. कोणत्याही पदराचा आधार घेतला की कोणतीही खोटी भूमिका सहज वठवता येते. तो अभिनय असतो, त्या अभिनयाच्या मुळाशी भावना नावाची गोष्टही नसते, ती मनातून आधीच गोठून गेलेली असते. गोठून गेलेल्या काळजाच्या देशात आपण राहत आहोत की काय? अशा वारंवार घटना या देशात गेल्या काही वर्षात घडवल्या जात आहेत, अवघ्या आठ वर्षाच्या मुलीवर चार ते पाच पशुप्रवृत्तीचे नराधम पाशवी अत्याचार करतात आणि तिला मारून टाकतात, एक देश एक धर्म अशी स्वप्ने बघणाऱयांच्या प्रोत्साहनाच्या परिणतीची ही कृती असते. पण ‘एक देश एक धर्म’साठी कार्यरत असणाऱयांना पूरक असे उपक्रम राबवून शासनच जेव्हा धर्माची भगवी पताका ठळक करण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या देशातील आयाबहीणच नाही तर त्याचा सार्वत्रिक परिणाम होऊन तो देशही सुरक्षित राहण्याची शक्यता कमीच असते. आपला देश अशाच उंबरठय़ावर असतानाच्या काळात सत्यशोधक दुखंडे व्याख्यानमाला सावंतवाडीत आणि कणकवलीतही सुरू करण्यात आली. ही फक्त एक सांस्कृतिक घटना नाही तर तो या काळातला महत्त्वाचा सांस्कृतिक राजकीय हस्तक्षेपच आहे!