|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » कल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी

कल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी 

पायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटींची तरतूद

भूमिपुत्रांना भागिदार करून घेणार

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

मुंबई / प्रतिनिधी

कल्याणमध्ये प्रस्तावित असलेल्या ग्रोथ सेंटरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तत्वत: मंजुरी दिली. त्यामुळे उद्योग-व्यवसायासाठी मुंबईवर अवलंबून असलेल्या उद्योजकांना आता कल्याण हा दुसरा पर्याय उपलब्ध होणार आहे. ग्रोथ सेंटर विकसित करण्यापूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याणमध्ये आधी रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. त्यासाठी एमएमआरडीएने एक हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवल्याची माहिती आज देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कल्याण ग्रोथ सेंटर आणि महापालिकेत समाविष्ट असलेल्या 27 गावांच्या प्रश्नावर बैठक झाली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकांचा फायदा व्हावा म्हणून त्यांना विकासात भागिदार बनविण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे स्थानिकांनी संयुक्त मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

स्थानिकांची मागणी असलेल्या 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत सरकार सकारात्मक आहे. तसेच स्थानिकांनी सहकार्य केल्यास ग्रोथ सेंटरसाठी जागा निश्चित करण्यात येईल. ज्या दिवशी रस्ते तयार होतील त्या दिवशी तेथील जमिनीच्या किमती तिप्पट वाढणार आहेत आणि भविष्यात दहापट वाढ निश्चित होणार आहे. या किंमत वाढीचा फायदा स्थानिकांना होईल. स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास प्रत्येक भूखंडधारक भूमिपुत्रासोबत करार करण्याची आणि वेळेत काम पूर्ण करण्याची सरकारची तयारी असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

कल्याण ग्रोथ सेंटरसाठी लागणारी पायाभूत सुविधांची उभारणी तीन ते चार वर्षात पूर्ण होईल. तसेच पुढील सात-आठ वर्षात इथे प्रत्यक्ष गुंतवणूक यायला सुरुवात होईल. प्रकल्प सुरू करण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे. आपल्या सर्व सूचनांवर सकारात्मक विचार करून पारदर्शकपणे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तर वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याण ग्रोथ सेंटरचा विकास करण्यात येणार असून स्थानिकांच्या मागण्यांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचे ठाणे जिल्हय़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष देसाई, महापौर राजेंद्र देवळेकर, संघर्ष समितीचे सदस्य, स्थनिक लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान, अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे आदी उपस्थित होते.

कल्याण ग्रोथ सेंट

जमिनीचे एकत्रिकरण करून स्थानिकांना प्रकल्पात भागिदारी

अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील

जमिनीच्या मालकांना किमान 50 टक्क्यांपर्यंत विकसित प्लॉट

निवासी, वाणिज्य इमारती बांधता येतील. टीडीआर, अतिरिक्त चटई क्षेत्राची सोय

Related posts: