|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट

नागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट 

पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास शिवसेनेचा विरोध

भाजपसमोर नवा पेच

मुंबई / प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास शिवसेनेने विरोध केल्याने अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे नागपूर अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा लागणार आहे.

संसदीय प्रथेप्रमाणे पावसाळी अधिवेशन मुंबईतच झाले पाहिजे, अशी भूमिका ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबादमध्ये मांडली. नागपूरला नुसते अधिवेशन घेऊन काय होणार? त्यापेक्षा विदर्भाला विकास योजना द्या, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे. परंपरेप्रमाणे मराठवाडय़ातही मंत्रिमंडळाची बैठक झाली पाहिजे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे पावसाळी अधिवेशनावरून भाजपसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन 4 जुलैपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन नागपूरला व्हावे म्हणून गटनेत्यांशी चर्चा करून एकमत करण्यासाठी मंत्री समिती नेमण्यात आली आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचे जवळपास निश्चित केले आहे. सरकारकडून पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू असताना शिवसेनेने वेगळा सूर लावला आहे. नागपूर अधिवेशनात विदर्भ, मराठवाडय़ाच्या प्रश्नावर चर्चा होते. अधिवेशनात झालेल्या निर्णयानुसार निधीची तरतूद करताना सरकारला अडचण येते. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याबाबत भाजप ठाम आहे. मात्र, शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपचे नेते नाराज झाले आहेत. पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर मग अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घ्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला

दरम्यान, शिवसेनेला भाजपसोबत युती करायची नसेल तर आमच्याकडूनही हा विषय संपल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे. मतविभाजन टाळण्यासाठी आम्ही युतीबाबत आग्रही आहोत. परंतु, उद्धव ठाकरे यांनी युती न करण्याचा निर्णय घेतला असेल तर भाजपकडूनही हा प्रस्ताव संपल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्ष एकत्र येत असताना भाजप-शिवसेनेची युती व्हावी. मतविभाजन टाळून ताकदीने निवडणुका लढवाव्यात, अशी आमची भूमिका आहे. पण शिवसेनेची स्वबळावर लढवण्याची तयारी असेल तर युतीचा विषय संपतो. युती करण्यासाठी दोन्ही पक्ष राजी असावे लागतात. नुसते आम्ही युती व्हावी असे म्हणून काय उपयोग, अशी हतबलताही मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली.

‘पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर मग अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घ्यावे लागेल.’ सुधीर मुनगंटीवार वित्तमंत्री

Related posts: