|Thursday, September 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सरन्यायाधीशांविरोधात विरोधकांचा महाभियोग प्रस्ताव

सरन्यायाधीशांविरोधात विरोधकांचा महाभियोग प्रस्ताव 

सात पक्षांच्या 64 खासदारांकडून नोटीस, काँगेसचा पुढाकार, विरोधकांमध्ये फूट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात महाभियोग चालविण्याचा प्रस्ताव काँगेसच्या पुढाकाराने राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रस्तावावर 7 पक्षांच्या 64 खासदारांच्या स्वाक्षऱया आहेत. न्या. लोया मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्याने विरोधकांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे. काँगेस सरन्यायाधीशांविरोधात राजकीय सूडबुद्धीचा उपयोग करीत असल्याची टीका भाजपने केली आहे. तसेच या प्रस्तावावरून विरोधकांमधील दुफळीही चव्हाटय़ावर आली आहे.

सरन्यायाधीशांनी आपल्या मर्यादांचा भंग केला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्याच काही न्यायाधीशांनी प्रकट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, अशी कारणे देत काँगेसचे नेते कपिल सिबल यांनी प्रस्तावाचे समर्थन केले. तथापि, या प्रस्तावावर ज्येष्ठ काँगेस नेते मनमोहनसिंग यांनी स्वाक्षरी केलेली नाही. तसेच सलमान खुर्शिद यांनी विरोध केला आहे. तृणमूल काँगेस व इतर अनेक विरोधी पक्षांनी प्रस्तावाचे समर्थन केलेले नाही. परिणामी, हा प्रस्ताव केवळ देखावा आहे का, असा प्रश्नही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

नायडूंकडे प्रस्ताव सुपूर्द

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याकडे शुक्रवारी दुपारी हा प्रस्ताव देण्यात आला. काँगेस नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिबल, डावे नेते डी. राजा इत्यादींनी त्यांची भेट घेतली. नायडू यांनी प्रस्तावावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

ही तर राजकीय सूडबुद्धी

विरोधकांचा, विशेषतः काँगेसचा हा महाभियोग प्रस्ताव नसून सूडप्रस्ताव असल्याची घणाघाती टीका केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे. लोया प्रकरणात निकाल विरोधात गेल्याने काँगेसने रडीचा डाव सुरू केला आहे. महाभियोग प्रस्तावाचा उपयोग न्यायव्यवस्थेला घाबरविण्यासाठी आणि राजकीय बदला घेण्यासाठी केला जात आहे. विरोधकांच्या दुःसाहसाची किंमत न्यायव्यवस्थेला भोगावी लागणे देशाच्या दृष्टीने घातक असल्याची तीव्र प्रतिक्रिया जेटली यांनी व्यक्त केली.

Related posts: