|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » विजयी घोडदौडीसाठी कोलकाता, पंजाब सज्ज

विजयी घोडदौडीसाठी कोलकाता, पंजाब सज्ज 

वृत्तसंस्था/ कोलकाता

मागील लढतीत दमदार विजय संपादन करणारे कोलकाता नाईट रायडर्स व पंजाब किंग्स इलेव्हनचे संघ आज येथील ईडन गार्डन्सवर आमनेसामने भिडणार आहेत. मागील लढतीत कोलकाताने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून नमवले तर पंजाबने सनरायजर्स हैदराबादचा 15 धावांनी धुव्वा उडवला. त्या पार्श्वभूमीवर येथे दोन्ही संघांचे मनोबल उंचावलेले असू शकते. या लढतीला सायंकाळी 4 वाजता सुरुवात होईल.

ऑस्ट्रेलियन सलामीवीर ख्रिस लिन बहरात नाही, ही सध्या कोलकातासाठी चिंतेची बाब आहे. मात्र, नवा स्टार नितीश राणा या हंगामात फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही आघाडय़ांवर बहरात आहे. राणाशिवाय, कुलदीप यादव व पियुष चावला देखील प्रतिस्पर्ध्यांना पेचात टाकत आले आहेत.

पंजाबतर्फे कर्णधार रविचंद्रन अश्विन व अफगाणिस्तानचा 17 वर्षीय फिरकीपटू मुजीब उर रहमान देखील ख्रिस लिनला शक्य तितक्या लवकर बाद करण्यासाठी प्रयत्न करतील. ख्रिस गेलने मागील लढतीत 11 उत्तूंग षटकार खेचत 63 चेंडूतच 104 धावांची आतषबाजी केली होती. त्यामुळे, पंजाबला त्याच्याकडून धमाकेदार फलंदाजीची अपेक्षा असेल. हैदराबादला मागील सामना केवळ 15 धावांनी गमवावा लागला असला तरी त्या लढतीत ते विजयाच्या आसपासही नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. गेलने यापूर्वी चेन्नईविरुद्ध देखील 33 चेंडूत 63 धावांची आतषबाजी केली होती.

पंजाब संघात ख्रिस गेलशिवाय, ऍरॉन फिंच, केएल राहुल, मायंक अगरवाल व अनुभवी युवराजचा समावेश आहे. विशेषतः त्यांच्या मध्यमगती गोलंदाजीत मात्र तितके वैविध्य दिसून आलेले नाही. मोहित हैदराबादविरुद्ध चांगलाच महागडा ठरला होता. आयपीएल इतिहासात आजवर दोन्ही संघ 21 वेळा आमनेसामने भिडले असून केकेआरने त्यात 14 तर पंजाबने 7 विजय नोंदवले आहेत.

संभाव्य संघ

कोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार-यष्टीरक्षक), सुनील नरेन, आंद्रे रसेल, ख्रिस लिन, रॉबिन उत्थप्पा, कुलदीप यादव, पियुष चावला, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, मिशेल जॉन्सन, शुभमन गिल, आर. विनयकुमार, रिंकू सिंग, कॅमेरुन डेलपोर्ट, सियर्लेस, अपूर्व वानखडे, इशांक जग्गी, टॉम कुरान.

किंग्स इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), अक्षर पटेल, युवराज सिंग, करुण नायर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), ख्रिस गेल, डेव्हिड मिलर, ऍरॉन फिंच, मार्कस स्टोईनिस, मायंक अगरवाल, अंकित राजपूत, मनोज तिवारी, मोहित शर्मा, मुजीब झॅद्रन, बरिंदर सरण, ऍन्ड्रय़्रू टाय, आकाशदीप नाथ, बेन ड्वॉर्शुईस, प्रदीप साहू, मायंक डगर, मन्झूर दार.

सामन्याची वेळ : सांय. 4 पासून.

आरसीबी-दिल्ली डेअरडेव्हिल्सला विजयाची नितांत गरज

बेंगळूर : सध्या गुणतालिकेतील तळाच्या स्थानी असणारे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर व दिल्ली डेअरडेव्हिल्सचे संघ आज दिवसभरातील दुसऱया लढतीत विजयाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. दोन्ही संघांना पहिल्या 4 सामन्यात केवळ एकच विजय संपादन करता आला आहे.

विराटच्या नेतृत्वाखालील आरसीबीने केकेआरविरुद्ध सलामीला पराभव स्वीकारल्यानंतर पंजाबला नमवले. पण, नंतर त्यांना राजस्थान व मुंबईविरुद्ध लागोपाठ हार स्वीकारावी लागली. कर्णधार विराट बहरात आल्याने ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरु शकेल. विराटने यापूर्वी राजस्थानविरुद्ध 57 तर मुंबईविरुद्ध नाबाद 92 धावांची तडाखेबंद खेळी साकारली होती. मुंबईविरुद्ध सलामीला फलंदाजीला उतरत त्याने 4 षटकार व 7 चौकार फटकावले. पण, त्याला अन्य सहकाऱयांकडून अपेक्षित साथ लाभली नाही.

एबी डिव्हिलियर्सने आतापर्यंत 122 धावा फटकावल्या असून येथे मोठी खेळी उभारण्याचे त्याचे इरादे असतील. 3 सामन्यात केवळ 47 धावा जमवणाऱया ब्रेन्डॉन मेकॉलमला आपली जागा इंग्लिश फलंदाज मोईन अलीला बहाल करावी लागू शकते. मोईन ऑफस्पिन गोलंदाजी करु शकत असल्याने त्याला प्राधान्य मिळू शकते.

दुसरीकडे, दिल्ली संघाला देखील आतापर्यंत एकच विजय मिळवता आला असून सर्वप्रथम त्यांना मागील लढतीतील कोलकाताविरुद्धचा पराभव विसरावा लागेल. दिल्लीला या हंगामातील सलामीच्या लढतीत पंजाबविरुद्ध व पुढे पावसाने व्यत्यय आल्यानंतर रॉयल्सविरुद्ध पराभव स्वीकारावे लागले. मुंबईविरुद्ध मात्र रॉयच्या 91 धावांमुळे त्यांनी बाजी मारली. स्पीडस्टार मोहम्मद शमी संघात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्लीतर्फे सध्या ऋषभ पंतने सर्वाधिक 138 धावा जमवल्या असून 47 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्याशिवाय, जेसॉन रॉय, गौतम गंभीर, श्रेयस अय्यर व ग्लेन मॅक्सवेलसारख्या जागतिक दर्जाच्या फलंदाजांवर त्यांची भिस्त असणार आहे.

संभाव्य संघ

आरसीबी : विराट कोहली (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), ब्रेन्डॉन मेकॉलम, एबी डिव्हिलियर्स, सर्फराज खान, मनदीप सिंग, ख्रिस वोक्स, वॉशिंग्टन सुंदर, कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, कॉलिन डे ग्रँडहोम, मोईन अली, मनन वोहरा, अनिकेत चौधरी, नवदीप सैनी, मुरुगन अश्विन, पवन नेगी, मोहम्मद सिराज, कोरी अँडरसन, पार्थिव पटेल, अनिरुद्ध जोशी, पवन देशपांडे, टीम साऊथी.

दिल्ली डेअरडेव्हिल्स : गौतम गंभीर (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅगिसो रबाडा, अमित मिश्रा, शाहबाज नदीम, विजय शंकर, राहुल तेवातिया, मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, कॉलिन मुन्रो, डॅनिएल ख्रिस्तियन, जेसॉन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ, गुरकिरत सिंग मान, अवेश खान, अभिषेक शर्मा, जयंत यादव, हर्षल पटेल, मनजोत कलरा, संदीप लमिचने, सायन घोष.

सामन्याची वेळ : रात्री 8 पासून.

Related posts: