|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू 

सावंतवाडी:

झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावर मळगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने मळगाव आजगावकरवाडी येथील तरुणाचा मृत्यू झाला. सुरेश भगत गावकर (45) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मळगाव-बादेकरवाडी येथील सुरेश गावकर हा आपल्या घराकडून आजगावकरवाडी येथे लग्न सोहळय़ासाठी गेला होता. तेथून रात्री 8.30 च्या सुमारास घरी जाण्यासाठी महामार्गावरून तो पायी चालत जात होता. या दरम्यान गोव्याहून कुडाळच्या दिशेने जाणाऱया अज्ञात चारचाकी वाहनाची त्याला धडक बसली. त्या धडकेने गावकर याला जबर मार बसला. तो रक्तबंबाळ व बेशुद्धावस्थेत पडला होता. अज्ञात वाहनचालक पोलिसांना माहिती न देताच तेथून पसार झाला. त्यानंतर त्या मार्गाने जाणाऱया ग्रामस्थांना सुरेश गावकर रस्त्यावर पडलेला दिसला. त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, उपनिरीक्षक अरुण सावंत, हवालदार वाय. के. वाघेरे, विकी गवस आदींनी भेट दिली. जखमी गावकर याला 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अपघाती निधनाने गावकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.