|Sunday, June 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आण्विक चाचणी करणार नाही : किम

आण्विक चाचणी करणार नाही : किम 

जगासाठी सुखद बातमी असल्याची ट्रम्प यांची टिप्पणी : उत्तर कोरिया-अमेरिका चर्चा लवकरच

वृत्तसंस्था / सेऊल

उत्तर कोरियाने आण्विक आणि दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी रोखण्याचा निर्णय घेतला. आण्विक चाचणी केंद्र देखील बंद करण्याची योजना असल्याचे उत्तर कोरियाने जाहीर केले. उत्तर कोरियाच्या सत्तारुढ पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आम्हाला आता आणखीन आण्विक चाचण्या घेण्याची गरज नाही. आमच्या आण्विक चाचणी स्थळाची मोहीम पूर्ण झाल्याचे किम जोंग उन यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रस्तावित भेटीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. किम यांची घोषणा दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यान चर्चेचे नवे पर्व सुरू होण्याअगोदर करण्यात आली आहे. परंतु निशस्त्राrकरणाच्या दिशेने वाटचाल करण्याबद्दल उत्तर कोरियाने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.

उत्तर कोरियाच्या घोषणेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विट करत उत्तर कोरिया समवेत पूर्ण जगासाठी ही चांगली बातमी असल्याची टिप्पणी केली. किम जोंग उन यांच्यासोबत होणाऱया भेटीबद्दल उत्सुक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आता अर्थव्यवस्थेवर लक्ष

राष्ट्रीय मुद्यांबद्दल देशाचा प्राधान्यक्रम बदलत असून आता अर्थव्यवस्था भक्कम करण्यावर लक्ष दिले जाणार असल्याचे उत्तर कोरियाच्या प्रमुख वृत्तसंस्थेने म्हटले. उत्तर कोरिया शेजारी देशांसमवेत आंतरराष्ट्रीय समुदायासोबत शांततेच्या प्रयत्नांमध्ये सामील होण्यासाठी उत्सुक दिसत आहे. किम जोंग उन स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती करून देण्यासाठी या चर्चेत सामील होत आहेत. उत्तर कोरिया जागतिक निर्बंधांपासून सुटका क्हावी याकरता प्रयत्न करत असल्याचे जाणकारांचे मानणे आहे.

किम यांच्या पत्नीला प्रथम महिलेचा दर्जा

हुकुमशहा किम जोंग उन यांनी पत्नी री सोल जू यांना प्रथम महिला घोषित केले आहे. उत्तर कोरियात 40 वर्षांनंतर हा सन्मान प्रदान करण्यात आला. पत्नीचा दर्जा वाढविण्यामागे किम यांचा उद्देश ट्रम्प यांच्यासोबत होणारी शिखर बैठक आहे. मे महिन्यात ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान मेलानिया यांच्याप्रमाणे स्वतःच्या पत्नीला बरोबरीचा दर्जा मिळवून देण्याचा किम यांचा प्रयत्न आहे.

18 वर्षांनंतर चर्चेची संधी

अमेरिका आणि उत्तर कोरियादरम्यान चर्चा घडवून आणण्यासाठी दक्षिण कोरियाने मध्यस्थीची भूमिका पार पाडली आहे. ट्रम्प आणि उन भेटीसाठी तयार झाल्याची माहिती दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चुंग युई-योंग यांनीच दिली. ऑक्टोबर 2008 मध्ये बिल क्लिंटन प्रशासनात विदेश मंत्री राहिलेल्या मेडलीन अलब्राइट यांनी किम यांचे वडिल आणि उत्तर कोरियाचे तत्कालीन हुकुमशहा किम जोंग द्वितीय यांच्याशी चर्चा केली होती. दोन्ही देशांदरम्यान मागील काही वर्षांमध्ये कमालीचे शत्रुत्व निर्माण झाले होते.