|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » महिलांकडे सन्मानाने पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण करा!

महिलांकडे सन्मानाने पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण करा! 

सावंतवाडीत निषेध सभा आम्ही भारतीयचे आयोजन

सावंतवाडी:

उन्नाव, कटुवा, सूरत आपल्या जिल्हय़ात अल्पवयीन मुली, महिला यांच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात येथील जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर निषेध सभेचे आयोजनआम्ही भारतीयमंचतर्फे करण्यात आले होते. यावेळी महिलांकडे सन्मानाने पाहण्याचा दृष्टीकोन आपल्या स्वतःमध्ये मुलांमध्ये निर्माण करण्याची शपथ प्रा. विजय फातर्पेकर यांनी उपस्थितांना दिली.

उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी, निरागस मुलींवर अत्याचार करणाऱया राक्षसी प्रवृत्तीचा निषेध करून अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. केंद्र सरकारने 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱया गुन्हेगारास फाशीच्या शिक्षेची तरतूद केली असल्याचे सांगितले.

माजी नगराध्यक्षा आनारोजीन लोबो म्हणाल्या, देशभरातील लैंगिक अत्याचाराचे लोण आता आपल्या जिल्हय़ातही येत आहे की काय, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. परंतु, समाज, पालक हे या विषयाकडे गांभिर्याने पाहत नाहीत.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचार करणारे गुन्हेगार हे बहुतांशीवेळा जवळचे नातेवाईक अथवा परिचित व्यक्ती असतात. त्यामुळे शाळांमधून लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे, असे मत सेलेस्तिन शिरोडकर यांनी व्यक्त केले.

डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, गौरी सावंतबांदेकर, अपर्णा कोठावळे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, ऍड. संदीप निंबाळकर, महेश पेडणेकर, नकुल पार्सेकर, विजय ठाकर, प्रशांत कोठावळे, महेश परुळेकर यांनी मनोगते व्यक्त केली. 10 वर्षांच्या मैत्री परुळेकर हिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

लैंगिक अत्याचार करणारा पुरुष हा कोणाचा तरी मुलगा, पती, नातेवाईक असतो. त्यामुळे अशा पुरुषांचे त्यांच्या पालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयातून शिक्षक, पालक विद्यार्थ्यांसाठी लैंगिक अत्याचार त्यातून निर्माण होणारे गंभीर स्वरुपाचे गुन्हे याची जाणीव करून देण्यासाठी मानसोपचार तज्ञ, डॉक्टर, वकील, शिक्षक यांनी मार्गदर्शन करण्यासाठी सभा, सेमिनार आयोजित करावे, कशी मागणी केली. सभेत अंतिमतः या अपप्रवृत्तीच्या विरुद्ध लढण्यासाठी शिक्षक, पालक, संवेदनशील नागरिकांची संघटना उभारून व्यापक प्रबोधनाची चळवळ उभी करण्याचा निर्धार केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक भारतीच्या शिक्षकांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमासाठी मूर्ती कासार, अनिता सडवेलकर, प्रज्ञा मातोंडकर, समीर बेग, नगरसेविका भारती मोरे, कमला मेनन, अनंत सावंत, प्रदीप सावंत, हरीहर वाटवे यांनी विशेष परिश्रम घेतले.