|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात महिला अत्याचाराच्या गुन्हय़ांत वाढ

राज्यात महिला अत्याचाराच्या गुन्हय़ांत वाढ 

गिरीश मांद्रेकर/ म्हापसा

महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशभरात सध्या बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षातील गोव्याची आकडेवारी पाहता गोव्यातही महिलांवरील अत्याचारात प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षात 220 बलात्काराच्या घटना घडल्याची नोंद आहे. महिलांवरील विनयभंगाच्या 504 तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत, तर अपहरण झाल्याच्या 193 तक्रारीही दाखल आहेत. बिगर गोमंतकीय युवकांकडून हे गुन्हे जास्त प्रमाणात घडल्याचे दिसून येते.

गेल्या तीन वर्षाचा आढावा घेतल्यास 2015 साली 448, 2016 साली 410 तर मावळत्या 2017 वर्षात हा आकडा 363 एवढा नोंदविण्यात आला. यावरून आजही महिला सुरक्षित नसल्याचेच चित्र स्पष्ट होत आहे. गेल्या तीन वर्षात विनयभंगाच्या सर्वांधिक म्हणजे 504 एवढय़ा तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. लैंगिक अत्याचार घडल्याच्या गेल्या तीन वर्षातील 220 घटना आहेत. विवाहितेचा छळ झाल्याच्या 53 तक्रारी नोंद आहेत. 2015 साली बलात्काराच्या 87 तक्रारी, 2016 साली 63 तर 2017 साली 70 तक्रारी दाखल आहेत. विनयभंग झाल्याच्या 2015 साली 187, 2016 साली 170 तर 2017 साली 147 तक्रारी दाखल आहेत.

तीन वर्षांत 193 महिलांचे अपहरण

तीन वर्षात एकूण 193 महिलांचे अपहरण झाल्याच्या तक्रारीही नोंद आहेत. यात 2015 व 2016 साली प्रत्येकी 69 व 2017 साली 55 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. हुंडाबळीच्या मात्र केवळ दोनच तक्रारी दाखल आहेत, तर हुंडाबळीमुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याचीही नोंद आहे. आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या गेल्या तीन वर्षात एकूण 16 तक्रारी दाखल आहेत. पैकी 2015 साली 7, 2016 साली 5 व 2017 साली 4 तक्रारी नोंद झाल्या आहेत. महिलांवरील अत्याचार प्रकरणी तीन वर्षात एकूण 98 तक्रारी दाखल झाल्या आहेत. पैकी 2015 साली 28, 2016 साली 39 तर 2017 साली 31 अत्याचाराच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत.

तीन वषांर्त महिलांवरील गुह्यांची संख्या 1221

या तीन वर्षांचा आढावा घेतल्यास महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी 2015, 2016 व 2017 मध्ये अनुक्रमे 448, 410 व 363 एवढय़ा असल्याचे स्पष्ट होते. एकूण गुह्यांची संख्या 1221 एवढी प्रचंड प्रमाणात आहे. विशेष म्हणजे न्यायालयात या तक्रीरी गेल्यावर सबळ पुरावा नसल्याने गुन्हेगार मात्र मोकाट सुटतात व पुन्हा तोच गुन्हा करण्यास मोकळे होतात. यासाठी तक्रारी त्वरित मार्गी लावण्यासाठी जलद न्यायालय सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या खटल्यांचा छडा आता जलद न्यायालयामार्फत लावण्यात येत आहे. राज्यात उत्तर गोव्यात तीन जलद न्यायालये आहेत व या न्यायालयात अशा गुह्यांचा छडा लावण्यात येतो.

सबळ पुराव्यांची गरज

याबाबत अधिक माहिती देताना एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारी वाढत आहेत ही गंभीर बाब आहे. या तक्रारी वाढण्याचे कारण शोधून काढणे गरजेचे आहे. महिलांवरील विनयभंगाच्या तक्रारींची सत्यताही पडताळून पाहण्याची गरज आहे. बऱयाचशा तक्रारी सबळ पुरव्याअभावी न्यायालयात टिकत नाहीत, असे ते म्हणाले.