|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण पट्टय़ातील अस्वस्थता वाढली!

खाण पट्टय़ातील अस्वस्थता वाढली! 

आमदार, मंत्र्यांसमोरील अडचणी तीव्र कामगारांना घरी बसविल्याने कुटुंबे चिंताग्रस्त

प्रतिनिधी/ पणजी

खाण पट्टय़ातील अस्वस्थता प्रचंड वाढली असून खाण अवलंबित कुटुंबे खाणबंदीमुळे प्रचंड दबावाखाली आली आहेत. राज्यातील खाण व्यवसाय लवकर सुरु होणार नाही याची खात्री पटल्याने खाणपट्टय़ात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. खाण पट्टय़ातील आमदारही यामुळे बरेच दबावाखाली असून खाण अवलंबितांची नाराजी कशी दूर करावी ही मोठी समस्या आमदारांसमोर आहे.

खाणबंदीमुळे ट्रकमालक प्रचंड अडचणीत आले आहेत. खाण कंपन्यांनी घरी बसविल्याने कामगारवर्गातही मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. खाण अवलंबित कुटुंबे सध्या हवालदिल बनली असून भवितव्याची चिंता त्यांना सतावित आहे. खाण कंपन्या बंद झाल्यामुळे ट्रक बंद ठेवावे लागत आहेत. मागील सुमारे सहा वर्षांच्या कालावधीत काही अवघेच महिने ट्रकांना काम मिळाले. मागील सहा वर्षात ट्रकमालकांचे आर्थिक उत्पन्न नाममात्र राहिले. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ाही ट्रकमालक प्रचंड कमकुवत बनले आहेत.

कामगारांना घरी बसविल्याने कुटुंबे चिंताग्रस्त

दुसऱया बाजूने खाणबंदीच्या नावाखाली खाण कंपन्यांनी कामगारांना घरी बसविले आहे. सेसा वेदांता, चौगुले या कंपन्यांनी बऱयाच कामगारांना घरी बसविले आहे. खाण कामगार बेकार बनल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे. खाण व्यवसाय आता लवकर सुरु होणे कठीण आहे. त्यामुळे काय करावे हा मोठा प्रश्न या कुटुंबांसमोर आहे. बहुतेक खाण कामगारांनी चाळीशी ओलांडलेली आहे. काही निवृत्तीपर्यंत पोचले आहेत. त्यामुळे वय वाढल्याने दुसरी नोकरी मिळणेही कठीण आहे. त्यामुळे पर्याय समोर नसल्याने कुटुंबे हवालदिल झाली आहेत.

खाण पट्टय़ातील आमदार अडचणीत

खाणबंदी आणि बेकारीमुळे खाण पट्टय़ातील लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. स्थानिक आमदारांच्या घरी ट्रकमालक, कामगार हेलपाटे मारीत आहेत. त्यामुळे आमदारांचीही मोठी अडचण झाली आहे. मागील पाच वर्षे खाण अवलंबितांचा तगादा आमदारांच्या मागे आहे. दरवेळी खाणी लवकर सुरु होणार, केंद्र सरकारचे त्यासाठी सहकार्य आहे हीच उत्तरे आमदार खाण अवलंबितांना देत आहेत. त्यामुळे खाण अवलंबितही आमदारांना प्रत्यक्ष कृतीबाबत विचारत आहेत. मागील पाच, सहा वर्षात खाण व्यवसाय पूर्ण स्वरूपात सुरु झालाच नाही. काही खाण कंपन्यांनी तर मागील पाच वर्षे खाणी बंदच ठेवल्या आहेत. केंद्र सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही व राज्य सरकारकडेही ठोस असे उत्तर नसल्याने सध्या खाण पट्टय़ातील आमदार अडचणीत आले आहेत.

लोकांना सामोरे कसे जाणार?

पुढील वर्षी लोकसभा निवडणुका आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी लोकांना सामोरे कसे जायचे? ही मोठी समस्या आमदारासमोर आहे. त्याबाबत पक्षाच्या प्रमुख नेत्यांपाशीही आमदारांनी आपली समस्या बोलून दाखविलेली आहे. खाणबंदी ही मोठी समस्या असून खाण पट्टय़ातील अस्वस्थता उद्रेक बनू नये याची काळजी घ्यायला हवी अशी सूचना पक्षीय नेत्यांना केलेली आहे. जनक्षोभ वाढत चालला असून हे पक्षाच्या दृष्टीने घातक असल्याचे केंद्रीय नेत्यांसमोरही स्पष्ट केलेले आहे. दिल्ली भेटीत वेळोवेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास ही बाब भाजप आमदार, मंत्र्यांनी आणून दिलेली आहे, मात्र केंद्र सरकारकडून फार मोठा प्रतिसाद मिळत नसल्याने सध्या भाजप आमदार, नेत्यांची चिंता वाढली आहे.