|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भ्रष्टाचाराला गाडा आणि स्वार्थ सोडा!

भ्रष्टाचाराला गाडा आणि स्वार्थ सोडा! 

किरण ठाकुर यांचे आवाहन : बाबुराव ठाकुर यांचा स्मृतीदिन, ‘धगधगत्या सीमाप्रश्नाचे महामंथन’ पुस्तकाचे प्रकाशन

‘तरुण भारत’च्या वेबपोर्टलचे अनावरण

प्रतिनिधी/ बेळगाव

पैसे खाणाऱयांना, शेतकऱयांना लुटणाऱयांना खडय़ासारखे बाहेर काढणे आज गरजेचे आहे. कायदे तुडवणारे आमदार-खासदार आज उपयोगाचे नाहीत. स्वतःचे आत्मपरीक्षण करा. स्वच्छ मत द्या. पुढच्या पिढीचा विचार करून प्रगल्भ मतदार बना. भ्रष्टाचाराला गाडा आणि स्वार्थ सोडा, असे आवाहन ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केले.

‘तरुण भारत’च्यावतीने संस्थापक कै. बाबुराव ठाकुर यांचा स्मृतीदिन, ‘धगधगत्या सीमाप्रश्नाचे महामंथन’ पुस्तिकेचे प्रकाशन आणि ‘तरुण भारत’च्या वेबपोर्टलचे अनावरण असा संयुक्त कार्यक्रम सोमवारी झाला. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी किरण ठाकुर बोलत होते.

आपले वडील बाबुराव ठाकुर वारलेले असताना आणि पूर्णपणे शोकसागरात बुडालेलो असतानाही 39 वर्षांपूर्वी याच दिवशी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या निधनाची बातमी देणारा पेपर आम्ही बाहेर काढला होता. ते सतत अनेकांच्या स्मरणात राहिले. हिमालयाएवढी उंची असलेल्या या व्यक्तीच्या पोटी जन्म झाला, याचा आपल्याला अभिमान वाटतो. त्यांच्या वारशामुळेच आजपर्यंतची वाटचाल झाली, या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले.

काही दिवसात स्वतंत्र न्यूज चॅनेल

बाबुराव ठाकुर यांनी अतिशय खडतर परिस्थितीत सुरुवात करून ‘तरुण भारत’ची स्थापना केली. त्यांच्या आईने त्यांना सोने विकून पैसे दिले होते. आज कोटय़वधी रुपयांची मशिनरी ‘तरुण भारत’कडे आहे. वेबपोर्टलचे उद्घाटन होत आहे. सर्वात जास्त विश्वासार्हता आमच्या वृत्तपत्रावर आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला. आजच्या वृत्तपत्रांसमोर देशातील लोकशाही बळकट करण्याचे आव्हान आहे. हे सांगतानाच एक मासिक ते युटय़ूबवरील चॅनेल आणि आता वेबपोर्टलपर्यंतचा प्रगतीचा आढावा घेताना काही दिवसात स्वतंत्र न्यूज चॅनेल घेऊन आम्ही पुढे येत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

लवकरच कौशल्य प्रशिक्षण विद्यापीठ

आज अनेक राजकारण्यांची वृत्तपत्रे आहेत. सरंजामशाहीचा धोका वाढतो आहे. मात्र, विश्वास जपत ‘तरुण भारत’ने वाटचाल केल्यामुळेच लोकमान्य ही आज भारतात प्रथम क्रमांकाची सोसायटी उभारता आली. श्रमाचे हे मोल आहे. लवकरच वडील बाबुराव ठाकुर यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण विद्यापीठाची स्थापना करणार आहोत. आम्ही राष्ट्रीय पक्षांप्रमाणे आमिषे दाखविली नाहीत. अनेकांना कायमस्वरुपी नोकऱया दिल्या. यामुळे कोणीही स्वार्थीपणा करून स्वतःच्या नैतिकतेला बाधा पोहोचवू नका, असे आवाहनही किरण ठाकुर यांनी यावेळी केले.

खानापुरातून दाखल झालेल्या आणि निवडणुकीत समितीच्यावतीने उमेदवारी अर्ज सादर केलेल्या विलास बेळगावकर यांचा उल्लेख करताना स्वच्छ चारित्र्याच्या बेळगावकर यांच्यासारख्या व्यक्तींना राजकारणात यश मिळायला हवे, असे किरण ठाकुर यांनी सांगितले. सेवंतीभाई शहा यांचे वडील चतुरदास शहा तसेच मधु कणबर्गी यांच्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.

शेतकऱयांना त्रास देणाऱयांना आम्ही माफ करत नाही. यामुळेच शेतकरी नेते शरद जोशी असोत किंवा आमच्या बेळगावचे नारायण सावंत असोत त्यांच्यासाठी आम्ही सक्रिय लढा देतो. समाजातल्या चांगल्या लोकांच्या विरुद्ध काम करणाऱयांना गाडणे हे जनतेचे कर्तव्य आहे, असे सांगताना स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरजही त्यांनी मांडली. ‘धगधगत्या सीमाप्रश्नाचे महामंथन’ हा सीमाप्रश्नातील लढय़ाचा इतिहास आहे. हा ठेवा पुस्तकरूपात जपून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. सर्वसामान्य व्यक्ती आणि युवकांना तो कळावा, हीच यामागची भावना आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रारंभी ‘तरुण भारत’च्या जुन्या अंकांच्या प्रदर्शनाचे माजी महापौर विजय मोरे यांच्या हस्ते फित कापून तर लोकमान्यचे कार्याध्यक्ष अशोक याळगी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. यानंतर मुख्य कार्यक्रमात व्यासपीठावर माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, विठ्ठलराव याळगी, संपादक जयवंत मंत्री, अशोक याळगी, तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष वाय. बी. चौगुले, लोकमान्यचे ज्ये÷ संचालक सेवंतीभाई शहा व सीमातपस्वी मधु कणबर्गी होते.

मान्यवरांच्या हस्ते बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यानंतर किरण ठाकुर यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. धगधगत्या सीमाप्रश्नाचे महामंथन पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या पुस्तिकेसाठी योगदान दिलेले संपादक जयवंत मंत्री, बेळगाव प्रतिनिधी प्रसाद सु. प्रभू, ले-आऊट आर्टिस्ट दिलीप कम्मार व बसवंत पाटील यांचा किरण ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘तरुण भारत’च्या वेबपोर्टलचे अनावरण झाल्यानंतर यासाठी परिश्रम घेतलेले आयटी मॅनेजर जयंत चव्हाण आणि सोशल मिडिया टीमचे पवन देशपांडे यांचाही गौरव किरण ठाकुर यांच्या हस्ते झाला.

एकी कायम राखूया

अशोक याळगी यांनी यावेळी बोलताना ‘तरुण भारत’च्या या प्रवासात 30 वर्षे सहभागी होता आले याबद्दल आपल्याला समाधान आहे, असे उद्गार काढले. ‘दै. तरुण भारत’ आणि सीमा चळवळ या अभिन्न गोष्टी आहेत. यामुळे फक्त ध्येयासाठी कार्यरत ‘तरुण भारत’ आणि किरण ठाकुर यांचे योगदान मोठे आहे. आज मराठी माणसात जी फाटाफूट झाली आहे. त्यामुळे पराभवाचा धोका आहे. मराठी माणसाला परकीय शक्तींची भीती नसून बेकीच कारणीभूत ठरते आहे. यामुळे एकी कायम राखूया, असे आवाहनही त्यांनी केले.

परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी बाबुराव ठाकुर यांच्या संदर्भातील जुन्या आठवणींना उजाळा देऊन अतुलनीय कामगिरी करणारे किरण ठाकुर व सहकाऱयांचे अभिनंदन केले. विठ्ठलराव याळगी यांनी काँग्रेस रोडचा जन्म, आंदोलनकर्त्या बाबुराव ठाकुर आणि जीवनराव याळगी यांना रक्तबंबाळ होईतोवर झालेली मारहाण आदी आठवणी सांगितल्या. ब्रिटिशकाळात इंग्रज अधिकारी मराठीत बोलायचे. आजचे हे सरकार कन्नडची सक्ती करत आहे. यासंदर्भात बोलताना सर्वोच्च न्यायालय अभ्यास करून योग्य तो निर्णय देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. वाय. बी. चौगुले यांनी ‘तरुण भारत’च्या एकंदर प्रवासाचा आढावा घेताना ‘तरुण भारत’ आणि किरण ठाकुर नेहमीच मरगळ आली की चेतवण्याचे काम करत आले आहेत, असे सांगितले. विद्यार्थीदशेत असताना परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली सत्याग्रह केल्यानंतर त्यांनी बाबुराव ठाकुरांसमोर उभे केले होते. ती आठवण सांगतानाच एकी करणे याची नैतिक जबाबदारी आहे. यासाठी पुन्हा आयुष्याच्या मशाली पेटवा, असे आवाहन त्यांनी सीमावासीयांना केले.

सीमातपस्वी मधु कणबर्गी यांनी आपले विचार मांडले. सध्याच्या परिस्थितीत काही मंडळी राजकीय पक्षांशी सौदेबाजी करून स्वतःची उमेदवारी लादू पाहात आहेत. अशावेळी त्या मंडळींना धडा शिकवायला हवा, अशी गरज त्यांनी मांडली.

‘तरुण भारत’चे मुख्य प्रतिनिधी उपेंद्र बाजीकर यांनी आभार मानले. यावेळी बेळगाव येथील राजीव गांधी यांच्या भेटीदरम्यानचा प्रसंग सांगताना त्यावेळी विरोधाला उभ्या असलेल्या मधु कणबर्गी यांच्या आठवणीचा उल्लेख त्यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले.