|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘आडय’ पक्षांनी दिली होती तुफानाची कल्पना

‘आडय’ पक्षांनी दिली होती तुफानाची कल्पना 

तुफानाची चाहूल देणारा पक्षी म्हणून ‘आडय’ची ओळख ः मच्छीमार बांधव या पक्षाला मानतात मित्र ः अंदाज ठरला अचूक

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

 मच्छीमारांचा समुद्रातील अत्यंत जवळचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘आडय’ पक्षांनी भर समुद्रात अनपेक्षितपणे येत असलेल्या तुफानाची सूचना देत हजारोंच्या संख्येने समुद्रातून उत्तरेच्या दिशेने स्थलांतर केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत सागरी तुफानाने कोकण किनारपट्टीला धडक दिली. मात्र तत्पूर्वी ‘आडय’ पक्षांनी दिलेल्या सूचनेनुसार व त्याच दरम्यान हवामान खात्यानेही दिलेल्या इशाऱयानुसार मच्छीमार बांधव किनाऱयावर सुखरुप पोहोचल्याने वित्त व जीवित हानीपासून किनारपट्टी बचावली.

दि. 14 पासून किनारपट्टीवर धडकलेले तुफान स्थानिक मच्छीमार बांधवांना पूर्णपणे अनपेक्षित असेच होते. खोल समुद्रात मच्छीमार आपापल्या होडय़ा व ट्रॉलर घेऊन मच्छीमारी करीत होते. 19 एप्रिलच्या दरम्यान खोल समुद्रातील बेटांवर वास्तव्य करून असणारे ‘आडय’ नावाचे पक्षी अचानकपणे हजारोंच्या संख्येने मोठय़ाने चिवचिवाट करीत अतिशय वेगाने उत्तरेच्या दिशेने प्रस्थान करताना मच्छीमारांना आढळून आले. त्यांचे हे प्रस्थान म्हणजे येणाऱया तुफानाची चाहूलच हे समिकरण ठरलेलच असतं. एरवी समुदात स्थिरावणाऱया या पक्षांना निसर्गातील येऊ घालणाऱया घडामोडींची आगाऊ सूचना कशी मिळते कुणास ठाऊक? त्यांना ही दैवी देणगीच असते. मच्छीमार बांधवांना समुद्री तुफानाची सूचना देणाऱया सागरी जलचरांच्याही वरचे स्थान या ‘आडय’ पक्षाला आहे. हा पक्षी सागरी तुफानाची अचूक कल्पना मच्छीमार बांधवांना देतो. त्यामुळे सावध झालेले मच्छीमार ताबडतोब किनारपट्टीच्या दिशेने परतू लागतात आणि त्यामुळे जीवित आणि वित्त हानी टळते.

19 एप्रिल रोजी या पक्षांनी खोल समुद्रातील मच्छीमार बांधवांना सावध करीत सिंधुदुर्ग किनारपट्टी सोडली. दुसऱयाच दिवशी हवामान खात्याने समुद्री तुफानाचा इशारा देत मच्छीमारांना माघारी परतण्याच्या सूचना केल्या आणि या पक्षांचे आणि हवामान खात्याने दिलेले इशारे मानल्यामुळे किनारपट्टीवरील मोठा अनर्थ टळला.

थोडक्यात सांगायचे तर निसर्गात असे अनेक जीव असतात की जे मानवाला आपला मित्र मानून त्यांना सहकार्य करीत असतात. त्यांना निसर्गातील घडामोडींची आगाऊ कल्पना मिळण्याची दैवी देणगी असते. पारंपरिक ज्ञानावर भरोसा ठेवून असलेला मच्छीमार बांधव अजूनही ‘आडय’ सारखे पक्षी तसेच तुफान, त्सुनामी, सागरी भूकंपाची आगाऊ सूचना देणाऱया जलचरांवर विश्वास ठेवून आहेत. हवामान खात्यापेक्षाही निसर्गाच्या या दुतांचे अंदाज तंतोतंत खरे ठरतात, असा विश्वास या मच्छीमार बांधवांना आहे. थोडक्यात सांगायचे तर कोकण किनारपट्टीला मोठय़ा तुफानाने धडक देऊनही ‘आडय’ पक्षाने आगाऊ कल्पना दिल्याने मच्छीमार बांधव नुकसानीपासून बचावले, असेच म्हणावे लागेल.

Related posts: