|Friday, January 18, 2019
You are here: Home » क्रिडा » दिल्ली डेअरडेव्हिल्स 6 सामन्यात पाचव्यांदा पराभूत

दिल्ली डेअरडेव्हिल्स 6 सामन्यात पाचव्यांदा पराभूत 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

ख्रिस गेलच्या गैरहजेरीतही किंग्स इलेव्हन पंजाब संघाने सोमवारी आयपीएल साखळी सामन्यात यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सला 4 धावांनी निसटती मात दिली आणि या हंगामातील आपली बहारदार, विजयी घोडदौड कायम राखली. दिल्लीचा संघ येथे विजयाच्या उंबरठय़ावर जरुर पोहोचला. पण, शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना श्रेयस अय्यरला षटकार खेचता आला नाही आणि त्यांना 6 सामन्यात पाचव्यांदा अपयश सोसावे लागले. या लढतीत प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पंजाबने निर्धारित 20 षटकात 8 बाद 143 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात दिल्ली डेअरडेव्हिल्सला 8 बाद 139 धावांवर थांबावे लागले.

विजयासाठी 144 धावांचे आव्हान असताना दिल्लीला पराभवाची श्रृंखला खंडित करण्याची नामी संधी होती. पण, 45 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार फटकावणाऱया श्रेयस अय्यरला अन्य सहकाऱयांकडून तोलामोलाची साथ लाभली नाही आणि इथेच दिल्लीची घरच्या मैदानावर मोठी पिछेहाट झाली. अन्य फलंदाजात पृथ्वी शॉ (10 चेंडूत 22), राहुल तेवातिया (21 चेंडूत 24) यांनीच थोडाफार प्रतिकार केला. या तिघांसह मॅक्सवेलचा (10 चेंडूत 12) अपवाद वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.

गोलंदाजीच्या आघाडीवर पंजाबतर्फे सामनावीर अंकित रजपूत (2-23), ऍन्ड्रय़्रू टाय (2-25) व मुजीब रहमान (2-25) यांनी प्रत्येकी 2 बळी घेत दिल्लीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. अश्विनने 4 षटकांचा कोटा पूर्ण केला असला तरी 19 धावात त्याला एकही बळी घेता आला नाही. गंभीरसारख्या अनुभवी खेळाडूचे नेतृत्व लाभलेला दिल्लीचा संघ या हंगामात 6 सामन्यात पाचव्या पराभवासह सध्या शेवटच्या स्थानी फेकला गेला आहे.

ख्रिस गेल पाठदुखीमुळे बाहेर

प्रारंभी, दिल्लीने नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. पाठदुखीमुळे ख्रिस गेलला विश्रांती देण्यात आली. दिल्लीला मात्र याचा फारसा लाभ घेता आला नाही. केएल राहुलने 15 चेंडूत 23 धावा जमवल्या. पण, त्याचा सहकारी सलामीवीर ऍरॉन फिंचला 2 धावांवरच परतावे लागले. मयंक अगरवाल (16 चेंडूत 21), करुण नायर (32 चेंडूत 34), युवराज सिंग (14), डेव्हिड मिलर (19 चेंडूत 26) यांनी दुहेरी धावसंख्या गाठली असली तरी यातील एकाही फलंदाजाला आक्रमक फटकेबाजी करता आली नाही.

कर्णधार अश्विन 7 चेंडूत 6 धावांवर बाद झाला तर ऍन्ड्रय़्रू टाय (3) डावातील शेवटच्या चेंडूवर तंबूत परतला. सरण एका चेंडूत शून्यावर नाबाद राहिला. गोलंदाजीत पदार्पणवीर लियाम प्लंकेटने 4 षटकात 17 धावांच्या बदल्यात केएल राहुल, मयंक अगरवाल व करुण नायर यांचे महत्त्वपूर्ण बळी घेतले. दिल्लीचे खराब क्षेत्ररक्षण डोळय़ात अंजन घालणारे ठरले. ग्लेन मॅक्सवेलने मिलरचा तर पृथ्वी शॉने अमित मिश्राचा सोपा झेल सोडला. दिल्लीने या सामन्यासाठी संघात पाच बदल केले होते.

 

दिल्लीच्या संघात 5 बदल

तत्पूर्वी, गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघात या लढतीसाठी थोडेथोडके नव्हे तर चक्क 5 बदल केले गेले. पण, तरीही पराभवाची मालिका सुरुच राहिली. इंग्लंडचा जलद गोलंदाज लियाम प्लंकेटला व 19 वर्षाखालील भारतीय कनिष्ठ संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ यांना आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. याशिवाय, मध्य प्रदेशचा सीमर अवेश खान, ऑस्ट्रेलियन गोलंदाज-अष्टपैलू डॅन ख्रिस्तियन, लेगस्पिनर अमित मिश्रा यांनाही संघात स्थान दिले गेले. जेसॉन रॉय, ख्रिस मॉरिस, विजय शंकर, शाहबाज नदीम व हर्षल पटेल यांना मात्र बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

Related posts: