|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » नफा कमाई, आंतरराष्ट्रीय संकेताने बाजारात घसरण

नफा कमाई, आंतरराष्ट्रीय संकेताने बाजारात घसरण 

वृत्तसंस्था /मुंबई :

सलग दोन सत्रात तेजी दिसून आल्यानंतर बाजारात घसरण होत बंद झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवरून कमजोर संकेत आणि वायदा बाजार समाप्तीची मुदत जवळ आल्याने नफा कमाई झाली. आशियाई बाजारात घसरत बंद झाले, तर युरोपियन बाजाराची सुरुवात कमजोर आणि अमेरिकेत 10 वर्षानंतर यील्ड गेल्या चार वर्षांत पहिल्यांदा 3 टक्क्यांच्या महत्त्वपूर्ण पातळीवर पोहोचला. गुरुवारी वायदा बाजाराची अखेर असल्याने तरलता दिसून येण्याची शक्यता आहे.

बीएसईचा सेन्सेक्स सुरुवातीलाच कमजोरीने उघडला होता. ही कमजोरी सत्राच्या जास्तवेळ टिकून आली असून 34,400 पर्यंत घसरला, तर 34,631 पर्यंत वधारला होता. दिवसअखेरीस 115 अंकांच्या घसरणीने 34,501 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 43 अंकाने कमजोर होत 10,570 वर स्थिरावला.

अमेरिकेत यील्डमध्ये वाढ आणि रुपया कमजोर होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये धास्ती दिसून आली. आंतरराष्ट्रीय पातळीवरून कमजोर संकेत मिळाल्याने धातू समभागात विक्री झाली. डॉलर मजबूत होत असल्याने आयटी कंपन्यांच्या समभागात खरेदी झाली असे गिओजित फायनान्शियल सर्व्हिसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले.

टाटा स्टील, आयसीआयसीआय बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लॅब, इन्डसइंड बँक, मारुती सुझुकी, ऍक्सिस बँक, एसबीआय, एल ऍण्ड टी, एचडीएफसी बँक 1.67-0.97 टक्क्यांपर्यंत घसरले. टॉवर व्यवसायातील भारती इन्फ्राटेलच्या विलीनीकरणामुळे भारती एअरटेलचा समभाग 3.37 टक्क्यांनी वधारला. मंगळवारी कंपनीने तिमाही निकाल जाहीर केला असून गेल्या 14 वर्षांतील सर्वात कमी नफा मिळाल्याचे दिसते. टीसीएस, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, इन्फोसिस, पॉवरग्रिड, येस बँक, बजाज ऑटो, कोल इंडिया 2.43-0.21 टक्क्यांनी वधारले.

बीएसईचा धातू निर्देशांक सर्वाधिक 1.43 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 1.33 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू 1.20 टक्पे, बँकेक्स 1.08 टक्के, पीएसयू 1.07 टक्क्यांनी घसरले. आयटी, तंत्रज्ञान, रिअल्टी निर्देशांकात खरेदी झाली.