|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आसाराम बापूला मरेपर्यंत जन्मठेप

आसाराम बापूला मरेपर्यंत जन्मठेप 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

जोधपूर नजीकच्या आपल्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आसाराम बापू या आध्यात्मिक गुरूला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आसारामचे दोन साथीदार शिल्पी आणि शरद यांनाही प्रत्येकी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. तर त्याचे आणखी दोन साथीदार शिवा आणि प्रकाश यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

याच गुन्हय़ाखाली आसाराम 31 ऑगस्ट 2013 पासून कारावासात आहे. त्याने या कालावधीत 12 वेळा जामिनावर सुटण्यासाठी प्रयत्न केले होते. तथापि, ते वाया गेले. साधारणतः पावणेपाच वर्षांच्या कालखंडानंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन पिडितेला न्याय मिळाला आहे. याबद्दल पिडितेच्या माता-पित्यांनी समाधान व्यक्त केले. तथापि, निर्दोष सुटलेल्या दोन व्यक्तींविरोधातही उच्च न्यायालयात अपील करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली.

आसारामच्या आश्रमात काही काळ राजस्थानातील जोधपूर शहरानजीकच्या मानाई खेडय़ातील पिडीत मुलगी वास्तव्यास होती. आई-वडिलांनी तिला उपचारांसाठी तेथे आणले होते. तिच्या असहायतेचा गैरफायदा उठवत आसारामने तिचे लैंगिक शोषण केले. तसेच तिच्यावर निर्घृण बलात्कार केला. या मुलीने तक्रार करण्याचे धाडस दाखविल्याने आसारामवर बालक लैंगिक शोषणविरोधी कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला.

गुजरातमध्येही प्रकरण

आसाराम विरोधात गुजरातमधील सुरत येथेही बलात्कार प्रकरण दाखल आहे. या प्रकरणात त्याचा पुत्र नारायण साई हाही एक आरोपी आहे. सुरतच्या दोन बहिणींनी त्यांच्यावर बलात्कार आणि बेकायदेशीरित्या डांबून ठेवल्याचे आरोप दाखल केले आहेत. हे प्रकरण सुनावणीच्या स्थितीत असून काही दिवसात त्याचाही निकाल लागणार आहे.

निकाल जोधपूर कारागृहात

हा निकाल न्यायालयात न देता जोधपूर येथील कारागृहातील विशेष कक्षात घोषित करण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. निकालाआधी जोधपूर व आसपासच्या परिसरात 10 दिवसांसाठी जमावबंदी कलम लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारांनाही सावध करण्यात आले आहे. आसारामची शिष्यसंख्या मोठी असल्याने ही खबरादारीची उपाययोजना करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. या सर्व राज्यांमध्ये काही ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Related posts: