|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राष्ट्रवादीबरोबर आघाडी नकोच

राष्ट्रवादीबरोबर आघाडी नकोच 

प्रतिनिधी /सांगली :

मनपा निवडणुकीत निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्यावी व जुन्यांना थांबवून नव्या चेहऱयालाही संधी दयावी, अशी भावना काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये, अशीही मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या नेत्यांनी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व बुथ कमिटय़ांच्या अध्यक्षांची बैठक येथील कच्छी भवन येथे घेतली. या बैठकीला युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, महिला कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील, कॉंग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी प्रकाश सातपुते, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार आदी उपस्थित होते.

यावेळी अतुल माने म्हणाले, काही स्वयंघोषित नेते परस्पर उमेदवार जाहीर करत आहेत. वीस वर्षे आम्ही पक्षाचे प्रामाणिक काम केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचा विचार होणे आवश्यक आहे. पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी देखील आम्ही लढणारच आहोत, असा इशारा त्यांनी दिला. किरणराज कांबळे म्हणाले, आंबेडकरनगरमधील डिजीटल फलक महापालिकेने काढला. महापालिकेत कॉंग्रेस पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे दलित समाजात नाराजी आहे. महापौर वगळता इतर एकाही पदाधिकाऱयाने अधिकाऱयांची चौकशी केली नाही. त्यामुळे नेत्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली. तर उमेदवारी देताना घराणेशाहीनुसार देऊ नये, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

रत्नाकर नांगरे म्हणाले, कॉंग्रेसने गेल्या निवडणुकीत जाहिरनामा प्रसिध्द केला होता. त्यातील झालेल्या कामाचे मार्केटिंग करावे. पक्षाने केलेली कामे जनतेसमोर मांडावीत व राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली तर आपले कार्यकर्ते नाराज होतील, असे मत व्यक्त केले. शिवाय ज्यांनी पदे भोगली आहेत. त्यांना आता थांबवावे व नवीन लोकांना संधी द्यावी, असे मत देखील त्यांनी मांडले.

प्रशांत पाटील-मजलेकर म्हणाले, कॉंग्रेसकडे सध्या गर्दी आहे. भाजपने केलेली कामे आता जनतेने चांगलीच ओळखली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कामे झाली आहेत. त्यापेक्षा महापालिकेच्या कामाला दर्जा चांगला आहे. नवीन उमेदवारांना संधी मिळत असेल तर जुने लोक थांबतील, असे मत व्यक्त केले.