|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » विधानपरिषदेसाठी शिवसेना मैदानात

विधानपरिषदेसाठी शिवसेना मैदानात 

नाशिकमधून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी;

कर्नाटकात काही जागा लढविणार?

शिवसेना करणार भाजपशी  सामना

आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेने गुरुवारी  विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघातून नरेंद्र दराडे यांची उमेदवारी जाहीर केली. याशिवाय रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघातून शिवसेनेकडून राजीव साबळे यांच्या नावाची चर्चा आहे.

विधानपरिषदेच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघासाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होऊ घातली आहे. गेल्या वर्षीच्या नगरपालिका, महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नाशिक विभागातील महत्त्वाच्या स्थानिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेवर भाजपने उमेदवार देण्याचे ठरवले आहे. भाजपचा उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच शिवसेनेने दराडे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

नाशिकप्रमाणे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपप्रणित एनडीएत दाखल झाल्याने भाजपकडून या मतदारसंघात उमेदवार दिला जाऊ शकतो. शिवसेनेनेही कोकणात उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूरमध्येही भाजप, शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार दिले जाऊ शकतात.

दरम्यान, शिवसेनेकडून कर्नाटकात विधानसभेच्या जवळपास 80 जागा लढविल्या जाणार असल्याचे कळते. सीमाभागात शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा दिला आहे. तसेच, सीमाभाग सोडून उर्वरित भागात शिवसेनेचे नेते उमेदवाराच्या प्रचारासाठी जाणार आहेत.

चौकट

विधानपरिषदेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी

आगामी विधानपरिषदेची निवडणूक दोन्ही काँग्रेस एकत्र लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी येथे दिली. आघाडीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीने कोकण, नाशिक, परभणी-हिंगोली आणि उस्मानाबाद-लातूर-बीड या चार जागांची मागणी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जो निर्णय घेतील तो मान्य केला जाईल, असे तटकरे यांनी सांगितले.

Related posts: