|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » राष्ट्रवादीत खांदेपालट निश्चित

राष्ट्रवादीत खांदेपालट निश्चित 

प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील,शशिकांत शिंदे यांच्यात चुरस

29 एप्रिलला पुण्याच्या बैठकीत होणार निर्णय

मुंबई / प्रतिनिधी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला नवा चेहरा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीसाठी येत्या 29 एप्रिल रोजी पुण्यात राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होत आहे. नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मंत्री जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यात चुरस आहे. याशिवाय विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचेही नाव चर्चेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्षपदावरून आपण पायउतार होत असल्याचे सांगितले. गेली चार वर्ष आपण पक्षाची जबाबदारी सांभाळली. आता पक्षाचे नेतृत्व माझ्याऐवजी दुसऱयाकडे द्यावे, अशी विनंती आपण पक्षश्रेष्ठींना केल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. तर, प्रदेशाध्यक्षपदासह इतर कार्यकारिणीची निवड 29 एप्रिलच्या बैठकीत होईल. पक्षात अनेक सक्षम नेते आहेत. त्यामुळे बैठकीत आम्ही सर्वजण एकत्र बसून नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करू, असे तटकरे म्हणाले.

दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बदनाम झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्वच्छ चेहरा देण्याचा प्रयत्न पक्षाचा आहे. त्यासाठी जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. पाटील यांनी 1999 ते 2014 या कालावधीत वित्त आणि नियोजन, गृह, ग्रामविकास अशी महत्त्वाची खाती सांभळली. मंत्री असताना पाटील यांच्यावर एकही आरोप झाला नाही. आता विरोधी पक्षात असताना पक्षाचे गटनेते म्हणून पाटील यांची विधानसभेतील कामगिरी उत्तम राहिली आहे. त्यामुळे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

कामगार नेते आणि सातारा जिह्याातील आमदार शशिकांत शिंदे हेही प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत आपली छाप पाडली आहे. तरुण असल्याने शिंदे यांच्या नावाचाही पक्षाकडून विचार होऊ शकतो.

तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती

दरम्यान, राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. पक्षाचे खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस तारिक अन्वर यांनी यासंदर्भातील नियुक्तीचे पत्र तटकरे यांना दिले.