|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा

नाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा आरोप

नाणारची अधिकृत माहिती सरकारकडे नाही

मुंबई / प्रतिनिधी

नाणार येथील प्रस्तावित तेल शुध्दीकरण प्रकल्पाला कडाडून विरोध होत असल्याने जनतेचे नाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा विकास आराखडा जाहीर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी येथे केला. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या विकास आराखडय़ाची माहिती महापालिका आयुक्त आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव जाहीर करतात हे मी माझ्या राजकीय कारकीर्दीत कधीच पाहिले नव्हते, असेही तटकरे यांनी सांगितले.

राजापूर तालुक्यातील नाणार येथील तेलशुध्दीकरण प्रकल्पाला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. शिवसेनेने सोमवारी नाणारमध्ये सभा घेऊन कोकणात प्रकल्प होऊ देणार नाही, असे जाहीर केले. तर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारसाठी लागू केलेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र देसाईंच्या घोषणेतील हवा काढून घेतली. यापार्श्वभूमीवर तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत नाणार प्रकल्पावरून सत्ताधारी पक्षात सुरू असलेल्या वादावर जोरदार टीका केली.

उद्योग मंत्र्यांनी नाणारसाठी जारी केलेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा करणे हे त्यांचे वैयक्तिक मत कसे असू शकते? धोरणात्मक निर्णयावर मंत्र्यांचे वैयक्तिक मत असते हे मला गेली 15 वर्ष मंत्री असतानाही कळले नव्हते, असा टोला तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. नाणार प्रकल्पाची प्रक्रिया सुरू झाली का? तर याची अधिकृत माहिती सरकारकडे उपलब्ध नसल्याचे तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त आठ तालुक्यांची यादी जाहीर केली. हे तालुके विदर्भ, मराठवाडय़ातील असून येथे पावसाचे प्रमाण कमीच असते. सरकारी आकडेवारीनुसार विदर्भ आणि मराठवाडय़ात दुष्काळ हा कायम असतो. मात्र, सरकारची दुष्काळाची परिभाषा काय आहे, याचे सध्या आकलन होत नाही, असा चिमटाही तटकरे यांनी काढला.

Related posts: