|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू

पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू 

पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभेसह पलूस-कडेगाव विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर

28 मे रोजी मतदान, 31 मे रोजी मतमोजणी

लोकसभेची रंगीत तालिम

मुंबई / प्रतिनिधी

लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून ओळखल्या जाणाऱया पालघर, भंडारा-गोंदिया मतदारसंघासह सांगली जिल्हय़ातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 28 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर तिसऱया दिवशी म्हणजे 31 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

लोकसभेत भंडारा-गोंदियाचे प्रतिनिधीत्व करणारे नाना पटोले यांनी डिसेंबर 2017 मध्ये भाजपचा आणि खासदारकीचा राजीनामा दिल्याने भंडारा-गोंदियाची जागा रिक्त झाली होती. भाजपचे खासदार ऍड. चिंतामण वनगा आणि काँग्रेसचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे अनुक्रमे पालघर तसेच पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली आहे. भारत निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यातील लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

उत्तरप्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने राज्यातील पोटनिवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. केंद्रातील भाजप सरकार पुढील महिन्यात पाचव्या वर्षात पदार्पण करेल, तर राज्यातील फडणवीस सरकारला साडेतीन वर्षाचा कालावधी झाला आहे. या दरम्यान राज्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचे जाहीर केले आहे. केंद्रात आणि राज्यात सहभागी असलेल्या शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. यापार्श्वभूमीवर मे महिन्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुका आणि निवडणुकीचे निकाल राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारे ठरू शकतात.

पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर

दरम्यान, पालघर, भंडारा-गोंदिया या लोकसभा आणि पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट यंत्र लावले जाणार असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. मतदान यंत्राबाबत संशयाचे वातावरण असल्याने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली आहे. यापार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीत प्रत्येक मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदाराला त्याने केलेल्या मतदानाची खात्री पटणार आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 पैकी औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, वर्धा, अमरावती, अचलपूर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, चंद्रपूर, यवतमाळ, अहमदनगर आणि भंडारा अशा 13 मतदारसंघात व्हीव्हीपॅटचा वापर झाला होता.

राज्यातील 17 जिल्हय़ांत आचारसंहिता

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी काही दिवसांपूर्वीच निवडणूक जाहीर झाली. विधानपरिषद निवडणुकीमुळे 13 जिल्हय़ांत आचारसंहिता लागू आहे. आता लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्याने भंडारा, गोंदिया, पालघर आणि सांगली अशा आणखी चार जिह्यांत आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

पोटनिवडणुकीचा 2018 चा कार्यक्रम

निवडणूक अधिसूचना जारी करणे   3 मे

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत      10 मे

उमेदवारी अर्जांची छाननी          11 मे

उमेदवारी अर्ज माघारीची मुदत           14 मे

मतदान                       28 मे

मतमोजणी आणि निकाल         31 मे

सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालिम

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर तीनही पोटनिवडणुका काँग्रेस लढवण्याची शक्यता

काँग्रेसकडून नाना पटोले आणि विश्वजीत कदम यांची उमेदवारी निश्चित

भंडारा-गोंदियात भाजपकडून आमदार परिणय फुकेंना पहिली पसंती

Related posts: