|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चंदगड नगरपंचायतीसाठी तिसऱयांदा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

चंदगड नगरपंचायतीसाठी तिसऱयांदा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार 

प्रतिनिधी /चंदगड :

चंदगड नगरपंचायतीसाठी तिसऱयांदा ग्रामपंचायत निवडणुकीवर सामुदायिक बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय चंदगड येथील रवळनाथ देवालयात रविवारी दुपारी झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे अध्यक्ष शिवानंद हुंबरवाडी होते.

प्रास्ताविक चंद्रकांत दाणी यांनी करून जोपर्यंत चंदगड येथे नगरपंचायत होत नाही, तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. एकीकडे एखादा रास्तारोको केला तरी त्याची दखल घेतली जाते. दुसरीकडे आम्ही जाहीर झालेल्या चंदगड ग्रामपंचायतीच्या सलग तीन निवडणुकांवर बहिष्कार घालूनही त्याची दखल घेतली जात नाही. निवडणुकीवर बहिष्कार म्हणजे लोकशाहीतील ब्रम्हास्त्र असून याचाही प्रभाव शासनावर पडत नसल्याची खंत शिवानंद हुंबरवाडी यांनी यावेळी व्यक्त केली. शिक्षक नेते शंकरराव मनवाडकर यांनी पुन्हा एकदा चंदगड बंदपासून आंदोलनाचा श्रीगणेशा करण्याचा विचार व्यक्त केला. जोपर्यंत चंदगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होत नाही, तोपर्यंत चंदगड शहरातील कुणीही  शासकीय कर भरू नयेत, असे आवाहन ब्लॅक पँथरचे नेते सुभाष देसाई यांनी केले. जिल्हय़ाचे पालकमंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून चंदगड नगरपंचायतीचा प्रश्न मार्गी लागू शकतो, त्या दृष्टीने निवडणुकीवर बहिष्कार घालून पाठपुरावा करण्याची महत्वपूर्ण सुचना सुनील काणेकर यांनी मांडली. नगरपंचायतीच श्रेय कुणीही घ्यावं, परंतु चंदगड नगरपंचायतीसाठी चंदगडच्या प्रत्येक राजकीय गटाने आपल्या आपल्या परिने योगदान दय़ावे, असे आवाहन माजी जि.प.सदस्य बाबुराव हळदणकर यांनी केले. यावेळी जि.प.सदस्य सचिन बल्लाळ, माजी जि. प. सदस्य राजेंद्र परिट, माजी सरपंच अरूण पिळणकर, भाजपाचे शहर प्रमुख समीर पिळणकर आदीनी महत्वपूर्ण सुचना मांडल्या.