|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जमीन रूपांतरणाची चौकशी करणार

जमीन रूपांतरणाची चौकशी करणार 

प्रतिनिधी /पणजी :

‘गोंयचो आवाज’ या संघटनेतर्फे गेल्या शक्रवारी मडगाव येथे झालेल्या जाहीर सभेत आमदारांवर करण्यात आलेल्या जमीन रूपांतरणाच्या आरोपांची गंभीर दखल नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी घेतली असून एकंदरीत प्रकरणाची चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी 5 सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. सरदेसाई यांचेही नाव त्या आमदारांमध्ये समाविष्ट आहे. एका महिन्यात ती समिती अहवाल देणार असून त्यानंतर पुढील कारवाई करण्याचे संकेत सरदेसाई यांनी दिले आहेत.

जाहीर सभेत ज्यांनी (गोंयचो आवाज) आमदारांवर आरोप केले त्यांनी आरोपांना पुष्टी देणारी किंवा ते आरोप सिद्ध करणारी सर्व कागदपत्रे समितीच्या स्वाधीन करावीत, असे सरदेसाई यांनी सूचविले आहे.

चर्चने केलेल्या रुपांतरणाचेही पुरावे द्यावेत

चर्चकडूनही मोठय़ा प्रमाणात जमिनीचे रूपांतरण झाल्याचेही समोर आले असून त्याबाबतीतही संबंधितांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे, कागदपत्रे या चौकशी समितीकडे सोपवावीत असेही सरदेसाई यांनी म्हटले आहे.

अहवालानंतर सरकार कारवाई करील

आमदार तसेच चर्चकडून झालेल्या जमीन रूपांतरण आरोपात कितपत तथ्य आहे हे तपासून पाहिले जाणार असून चौकशी समितीच्या शिफारशीप्रमाणे आणि अहवालानुसार सरकार पुढचे पाऊल उचलेल, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान चर्चकडून जमीन रूपांतरण झाल्याचा व्हिडीओ काही कागदपत्रे-पुराव्यानुसार व्हायरल झाला असून सुमारे 1.30 लाख चौ. मी. जमीन रूपांतरीत करण्यात आल्याचा दावा त्या व्हिडीओत आहे. सुमारे 5 लाखापेक्षा जास्त चौरस मीटर जमीन रूपांतरीत करण्याची मागणी विविध चर्चकडून आली होती, परंतु ती सर्व जमीन रूपांतरीत करण्यात आली नाही. ठराविक जमीनच रूपांतरीत केली आणि बाकीची तशीच ठेवण्यात आल्याचे व्हिडीओतून दाखवण्यात आले आहे.