|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गाडगेबाबांच्या रुपाने आदर्शाचा हिमालयच!

गाडगेबाबांच्या रुपाने आदर्शाचा हिमालयच! 

ज्येष्ठ अभ्यासक ऍड. संभाजी मोहिते यांचे प्रतिपादन : गाडगेबाबा मानवतेचा परिसविषयावर कणकवलीत व्याख्यान

कणकवली:

मानवी जीवन हे विज्ञाननिष्ठ, कर्मकांडमुक्त असायला हवे हा विचार गाडगेबाबांनी 100 वर्षांपूर्वी रुजविला. देव, कर्मकांडावर प्रचंड प्रहार करणाऱया गाडगेबाबांनी स्वच्छतेबरोबरच अस्पृश्यता निर्मूलन व्यसनमुक्तीसाठीही ताकदीने काम केले. त्यांनी ज्याज्या विषयाला स्पर्श केला, त्याचे आज शासनाने कायदे बनविले आहेत. म्हणूनच बाबांच्या रुपाने आदर्शाचा हिमालयच आज समाजासमोर उभा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक ऍड. संभाजी मोहिते यांनी केले.

कणकवली येथे संवाद परिवार आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत सोमवारी दुसरे पुष्प गुंफतानागाडगेबाबामानवतेचा परिसया विषयावर मोहिते बोलत होते. ग्रामस्वच्छता अभियानाला कुणाचे नाव द्यायचे, याविषयी शासनाला प्रश्न पडला नव्हता. कारण, गाडगेबाबांच्या रुपाने उत्तम आदर्श राज्यासमोर होता, असेही ते म्हणाले.

कष्टकरी कुटुंबात जन्म!

बाबांच्या बालपणापासूनच्या जीवनाविषयी बोलताना मोहिते म्हणाले, अमरावती जिल्हय़ातील त्यावेळी फक्त शेतीवर उदरनिर्वाह करणारे शेणगाव हे बाबांचे गाव. तेथील परिट समाजातील त्यांचा जन्म. हा समाज गावातील लोकांचे कपडे धुवायचा. त्या बदल्यात भाकरी मिळायची. मोठय़ा प्रमाणात अंधश्रद्धा असल्याने संकटप्रसंगी पुरोहिताकडे जायचे. पुरोहित कौल लावून गुरुवार, उपवास, कोंबडीबकरीचा नैवेद्य असे उपाय सांगायचा. यातच गाडगेबाबांचे वडील झिंगराजीही होते. कर्मकांड, नवस, व्यसनामुळे वडील कर्जबाजरी झाले. त्याच सुमारास गाडगेबाबांचा जन्म झाला. अखेर वडील मरण पावल्यानंतर आई सखुबाई ही लहान बाबांना घेऊन माहेरी गेली.

अन् भजन कीर्तनाची गोडी!

त्यावेळी तमाशामधून चांगले प्रबोधन व्हायचे. तेच विचार घेऊन गाडगेबाबा मोठे होत होते. सायंकाळी भजन, कीर्तनासाठी माणसे मंदिरात जमायची. गाडगेबाबा भजने ऐकून गोड आवाजात म्हणू लागले होते. येथूनच त्यांना भजन, कीर्तनाची गोडी लागली होती, असे त्यांनी सांगितले.

सावकारीला अद्दल घडविली!

ते म्हणाले, त्याकाळात अडलेले शेतकरी कर्जासाठी सावकाराकडून कर्ज घेऊन जमीनजुमला गहाण ठेवायचे. बाबांच्या मामाला एका सावकाराने गोडीगुलाबीने 15 एकर शेत दिले. मात्र, त्याची मालकी सावकाराकडेच राहिल्याने शेतीतील बहुतांश माल सावकाराकडे जायला लागला. आपण पिकविलेली शेती सावकाराकडे जाते, हे तरुण वयातील बाबांना रुचत नव्हते. एके दिवशी तयार झालेले पीक घेऊन ते सावकाराकडे गेले. त्यांनी सावकाराकडे पिकाची पावती मागितली. संतप्त सावकाराने बाबांच्या मामाला बोलावून ती 15 एकर शेती ताब्यात घेणार असल्याचे सांगितले. त्या धक्क्याने बाबांच्या मामाचे निधन झाले. पुढे मृग नक्षत्रात बाबा शेतात गेले. त्यावेळी वहिवाट घालण्यासाठी आलेल्या सावकाराने त्यांना मारण्यासाठी माणसे आणली. मात्र, बाबांनी उलट त्यांनाच मारले, ही क्रांतिकारी नोंद असल्याचे मोहिते म्हणाले.

अखेर समाजाच्या संसारासाठी घरत्याग!

मात्र, बाबा अस्वस्थ होत चालले होते. विषमता, अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार संपण्याच्या हेतूने अखेर 1 फेब्रुवारी 1905 रोजी अंगावरच्या वस्त्रानिशी सर्वसंग परित्याग करून ते घराबाहेर पडले. सर्व काही सुरळीत असताना, दोन मुले पोटाशी असताना बाबांनी घर सोडले ते समाजाचा संसार करण्यासाठीच. सलग 12 वर्षे वाट मिळेल, त्या दिशेने ते चालत राहिले, असे त्यांनी स्पष्ट केले.

अन् ते गाडगेबाबा बनले!

त्यांच्या हातात फुटके खापर असायचे. खापर पाणी पिण्यासाठी, ताट म्हणून, टोपी म्हणून वापरता यायचे. म्हणूनच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणायला लागले. रस्त्यावरून चालताना एखाद्या माऊलीच्या डोक्यावरील लाकडाचा भारा तिच्या घरी पोहोचविण्यासाठी मदत करणारे बाबा कधीकधी एखाद्या श्रीमंताच्या घरात जाऊन काही तरी गोडधोड मागून मुद्दाम कळ काढायचे. तो श्रीमंत बाबांना मारायचा. कधी एखाद्या श्रीमंताच्या शेतातील विहिरीवर जाऊन पाणी पिऊन नंतर आपण महार असल्याचे ते सांगायचे त्या श्रीमंताचा मार खायचे. याचे कारण म्हणजे, अस्पृश्यतेचे परिणाम कसे भोगावे लागतात, याचा प्रयोग ते स्वतःवर करायचे. जे वेदांना सांगता आले नाही ते जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष कृतीशील जगण्याचा मंत्र त्यांनी जपला, असाही दाखला त्यांनी दिला.

माणसाला आंतरबाहय़ स्वच्छ करणारे बाबा!

ते म्हणाले, बाबा फिरताफिरता गावांमध्ये जाऊन सारा परिसर स्वच्छ करायचे. हा स्वच्छतेचा मंत्र त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला. स्वच्छतेनंतर सायंकाळी गावातील मंदिरात ते गोड आवाजात कीर्तन करायचे. बाबांनी माणसाला आंतरबाहय़ स्वच्छ करण्याचे व्रत अंगिकारले होते. त्यांनी तरुण पिढीला शिक्षणाचा संदेश दिला. लौकिकार्थाने शाळेची पायरी चढलेले बाबा हे कीर्तनामधूनअंगावर नवीन कपडा घेऊ नका. मुलाला पुस्तक घेतल्याशिवाय राहू नका,’ असे सांगायचे.

निःस्वार्थी गाडगेबाबा!

समाजासाठी भरीव काम करीत असताना मोठय़ा प्रमाणात वर्गणी जमा होऊ लागल्याने त्याचे करायचे काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अखेर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेले. मात्र, त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांनातुम्ही वर्गणीचा योग्य तो वापर करा. पण, त्या योजनेमधील पैशाचा फायदा मला माझ्या नातेवाईकांना मिळणार नाही, हे स्पष्ट लिहा,’ असे त्यांनी बाबासाहेबांना सांगितले होते. गाडगेबाबांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे मोहिते म्हणाले.