|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अखेर आटपाडी नगरपंचायत जाहीर

अखेर आटपाडी नगरपंचायत जाहीर 

प्रतिनिधी/ आटपाडी

तालुक्याचे ठिकाण असलेल्या आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर अखेर नगरपंचायतमध्ये झाले. बुधवारी याबाबतची अधिसूचना निघाली. आटपाडीची नगरपंचायत होणार असल्याचे यापूर्वीच सरकारने जाहीर केले असलेतरी त्याचा निर्णय न होता आटपाडी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर आटपाडी नगरपंचायतचा मार्ग मोकळा झाला. या अधिसूचना व निर्णयाबाबतची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली.

आटपाडी तालुक्याचे ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या जवळपास 35 हजाराच्या घरात आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहराचे रूपांतर नगरपंचायत-नगरपालिकेत करण्याचा निर्णय यापुर्वी शासनाने घेतला. जिल्हय़ातील व राज्यातील सर्व शहरांना तो निर्णय लागू झाला. आटपाडी मात्र त्याला अपवाद ठरले. त्यानंतर आ. अनिल बाबर यांनी आटपाडीची नगरपंचायत-पालिका करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत तातडीने निर्णयासाठी विधानसभेतही प्रश्न उपस्थित केला. शासनाने त्याबाबत सभागृहात उत्तर देताना महिन्यात निर्णयाची ग्वाही दिली. परंतु निर्णय जाहीर झालाच नाही. मागील महिन्यात बाबर यांनी नगरपंचायतची अधिसुचना जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु तो निर्णयही शासनाने जाहीर केला नाही. त्यामुळे आटपाडी नगरपंचायतबाबत संभ्रम झाला. याच कालावधीत आटपाडी ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने आटपाडीसह तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय पटलावर चर्चांना उधाण आले.

आमदार बाबर यांनी आटपाडी नगरपंचायतचा निर्णय तातडीने करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱयांकडे पाठपुरावा केला. आणि बुधवारी मंत्रालयात जागेवर बसून याबाबतचा निर्णय करवून घेतल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांनी सांगितले. आमदार अनिलभाऊ हे विकासकामासाठी प्रतिष्ठा पणाला लावुन काम करणारे नेते आहेत. त्यांच्या प्रयत्नातून मतदारसंघाने सर्वांगिण विकास केला आहे. आटपाडी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होईपर्यंत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. परंतु आमदारांनी मागे न हटता लोकांना दिलेला शब्द पाळुन आटपाडीच्या सर्वांगिण विकासाचा पाया घालुन त्याला चालना देण्याचे काम केल्याचे तानाजी पाटील यांनी सांगितले.

आटपाडी नगरपंचायतच्या अधिसुचना तातडीने म्हणजे बुधवारी निघाली असून यात आटपाडीसह भिंगेवाडी व मापटेमळा या गावांचा समावेश आहे. पुर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर दिशेला असणाऱया हद्दी, गट नंबरसह नगरपंचायतचा तपशील शासनाच्या उपसचिवांनी राज्यपालांच्या आदेशाने अधिसुचनेमध्ये समाविष्ट केला आहे. हा आदेश तातडीने निवडणूक आयोगालाही सादर करण्यात आला असून त्यामुळे आटपाडी ग्रामपंचायतची निवडणुक प्रक्रियाही स्थगित होणार आहे.

या अधिसुचनेमुळे अनेक वर्षांपासूनचा नगरपंचायत किंवा पालिका हा विषय निकाली निघाला आहे. या निर्णयाचे शिवसेना समर्थकांसह आटपाडीकरांनी स्वागत केले. शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव पाटील व सहकाऱयांनी या निर्णयाबाबत आ. अनिल बाबर, तानाजी पाटील यांचे अभिनंदन करून आटपाडीच्या विकासाचा पाया रोवल्याची भावना व्यक्त केली.