|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाळपई नगरपालिकेच्या विनावापर गाळय़ांचा पुन्हा लिलाव करणार

वाळपई नगरपालिकेच्या विनावापर गाळय़ांचा पुन्हा लिलाव करणार 

प्रतिनिधी/ वाळपई

वाळपई नगरपालिकेच्यावतीने भाडोत्री तत्त्वावर देण्यात आलेली दुकाने मात्र काही कारणास्तव नागरिकांनी परत केलेल्या दुकानांचा पुन्हा एकदा लिलाव करण्याचा निर्णय वाळपई नगरपालिका मंडळाच्या खास बैठकीत घेण्यात आला. यामुळे परत केलेल्या दुकानांची पुन्हा एकदा लिलाव होणार असल्याने याचा फायदा नागरिकांना होणार आहे. मात्र ज्या दुकानदारांनी थकबाकी भरलेली नाही त्यांच्यावर थकबाकीचे खटले दाखल करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, वाळपई नगरपालिका क्षेत्रात सरकारी निधीतून उभारण्यात आलेल्या मार्केट कॉम्प्लेक्स व प्रशासकीय इमारतीमध्ये उपलब्ध असलेल्या गाळय़ांचा लिलाव नगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी केला होता. यावेळी अनेक नागरिकांनी सदर गाळे वेगवेगळय़ा स्वरुपाच्या व्यवसायासाठी लिलाव पद्धतीवर नगरपालिकेकडून घेतले होते मात्र काही गावांमध्ये व्यवसाय चालविणे कठीण असल्याने व नगरपालिकेची भाडे प्रक्रिया परवडणारी नसल्याने अनेकांनी दुकाने बंद करून पुन्हा एकदा नगरपालिकेकडे सुपूर्द केलेली आहेत तर काही दुकानांना थकबाकीच्या कारणास्तव नगरपालिकेने टाळे ठोकून ती बंद केली आहेत. या दोन्ही तत्त्वांच्या दुकानांचा लिलाव पुन्हा एकदा करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या खास बैठकीत घेण्यात आलेला आहे. याबाबतची महत्त्वाची बैठक नगराध्यक्ष परवीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली व याबाबतच निर्णय घेण्यात आला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गेल्या जवळपास दीड वर्षापासून अनेक दुकाने बंद असल्याने अनेकांना टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात आल्याने नगरपालिकेचे उत्पन्न बऱयाच प्रमाणात कमी झाले. यामुळे सदर उत्पन्नात वाढ व्हावी व उत्पन्न पुन्हा एकदा सुरू व्हावे, यासाठी सदर प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सूत्रांनी स्पष्ट केले.

या संदर्भात नगराध्यक्ष परवीन शेख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, नगरपालिकेच्या माध्यमातून सदर गाळे भाडे तत्त्वावर दिल्यास नगरपालिकेच्या तिजोरीत चांगल्या प्रमाणात महसूल जमा होणार असल्याने मंडळाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. जवळपास पंधरा दुकानांच्या जुन्या थकबाकीदारां संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, मंडळाच्या बैठकीत थकबाकी वसुलीची प्रक्रिया कायदेशीर सोपस्काराने करण्यात येणार असून ज्यांची थकबाकी आहे, त्यांच्यावर थकबाकीचे खटले दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. वाळपई नगरपालिकेला गाळय़ांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात उत्पन्न प्राप्त होणार आहे व अनेक गाळे अनेक कारणास्तव आजही भाडेतत्त्वावर गेलेले नाहीत. त्यासंदर्भात नगरपालिकेच्या यंत्रणेने गांभीर्याने पावले उचलली असून सर्व गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी वेगवेगळय़ा संकल्पना अंमलात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात घेण्यात आलेल्या नगरपालिकेच्या बैठकीस उपनगराध्यक्ष सरफराज सय्यद, मुख्याधिकारी सिंथिया मिस्कता, नगरसेवक रामदास शिरोडकर, अनिल काटकर, अतुल दातये, रशिकांत च्यारी, अंजली च्यारी, परवीन खान, सेहझिन शेख व इतरांची खास उपस्थिती होती.