|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सत्याची कास धरून सत्तेपर्यंत जाऊया

सत्याची कास धरून सत्तेपर्यंत जाऊया 

प्रतिनिधी/ पणजी

काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटितपणे काम करीत जनतेचे सेवक म्हणून कार्यरत राहुया. सत्याची कास धरून सत्तेपर्यंत जाऊया, असा संकल्प सोडून गिरीश चोडणकर यांनी केंद्रीय नेते, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

काँग्रेसचे सर्व आमदार, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. महत्त्वाचे म्हणजे तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. केंद्रीय नेते आणि गोव्याचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार, महाराष्ट्राचे नेते अमित देशमुख, मिलिंद देवरा, खासदार राजीव सतवा, व्ही. पी. सिंग यांची उपस्थिती होती. विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर, आमदार लुईझिन फालेरो, प्रतापसिंह राणे, रवी नाईक, दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड, फिलीप नेरी, नीळकंठ हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा, दयानंद सोपटे, श्रीमती जेनिफर मोन्सेरात, आंतोन फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्स, विफ्रेड डिसा, क्लाफासियो डायस तसेच महिला पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून राबणार

गोव्याची आई म्हादईला साक्षी ठेवून, पक्ष घडविण्याऱया नेहरू, गांधी यांना नमन करून, तसेच ज्येष्ठांचा आशीर्वाद व पक्षकार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने आपण पक्षाची सूत्रे घेऊन प्रामाणिक कार्यकर्ता म्हणूनच काम करणार असल्याचे चोडणकर म्हणाले. काँग्रेसने आज एका गरीब कार्यकर्त्याला पक्षाचा नेता बनविले, याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. त्याचबरोबर आपण प्रदेशाध्यक्ष नसून पक्षाचे सर्वच कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष असल्याचे ते म्हणाले. आपल्या आवेशपूर्ण भाषणात चोडणकर यांनी पक्षबांधणीपासून सरकारच्या ध्येयधोरणापर्यंतचा आढावा घेतला.

काँग्रेसकडूनच गोव्याचा, देशाचा चौफेर विकास

काँग्रेस पक्षाने देशातील गरीबी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याच पक्षाने देश बदलला. याच पक्षाने गोव्याला घटक राज्याचा दर्जा दिला. याच पक्षाने गोव्याला जनमताचा कौल दिला, कोंकणी भाषेला राज्य घटनात्मक संरक्षण दिले. याच काँग्रेस पक्षाने गोव्याचा चौफेर विकास केला. अशा पक्षाचा अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारताना आपल्याला मोठा अभिमान वाटत असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. एक साधा कार्यकर्ता, साध्या परिवारातला कार्यकर्ता आज काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला, हे केवळ काँग्रेस पक्षातच घडू शकते, भाजपात नव्हे. भाजपचा अध्यक्ष संघ ठरवितो, असेही ते म्हणाले.

सर्वांच्या कार्याबद्दल काढले प्रशंसोद्गार

आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी, पक्षाचे वरिष्ठ नेते व स्थानिक नेते यांचे आभार मानले. बूथ स्तरापासून इथपर्यंत पोचताना काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे मला सहकार्य लाभले व मार्गदर्शन मिळाले. आपल्या जडणघडणीत सर्व काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, नेते व कार्यकर्ते यांचे योगदान आहे. माजी अध्यक्ष शांताराम नाईक, लुईझिन फालेरो, सुभाष शिरोडकर यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. सरकार विरोधी आक्रमकपणे काम केलेल्या काँग्रेसच्या आमदारांबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले. तसेच महिला काँग्रेसनेही मोठी कागगिरी केली. नव्या जोशाने यापुढे काम करूया असा संकल्पही त्यांनी सोडला.

लोकांना जिंकले तरच निवडणूक जिंकू

पुन्हा एकदा मूळ उद्दीष्ठाकडे जाण्याची गरज असून पक्ष बांधण्यासाठी सर्वजण मिळून झटुया, असे ते म्हणाले. पक्ष कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. गोव्यातील जनतेला भेडसावणाऱया समस्यांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. आज मुद्यांचे राजकारण तसेच चळवळीचे राजकारण करणे गरजेचे आहे. हे केले तरच लोक काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होतील. लोकांना जिंकले तर निवडणूक जिंकणे सोपे जाईल, असेही ते म्हणाले