|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आघाडी झाल्यास बालेकिल्यात बिघाडी

आघाडी झाल्यास बालेकिल्यात बिघाडी 

विशाल कदम/ सातारा

भंडारा येथील निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी आघाडीची भाषा केल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात अनेकांना आनंदाच्या उकळय़ा फुटल्या आहेत. लोकसभा, विधानसभेचे घोडेमैदान अजून लांब असून आतापासून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आघाडी झाल्यास आठ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन पुन्हा तिढा निर्माण होणार असून  राष्ट्रवादीतील काहीजण बंडखोरी करण्याची शक्यता निर्माण होणार आहे. याचा फायदा उठवण्यासाठी शिवसेना-भाजप कसोशीने प्रयत्न करेल. तर जिल्हय़ात नामशेष होत असलेली काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने उभारी घेण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सातारा जिह्यात तसे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकमेकांचे विरोधकच मानले जातात. राज्यात जरी त्यांची यापूर्वी आघाडी असली तरीही जिह्यात बिघाडीच होती. मात्र, आता भंडारा निवडणुकीवेळी राज्यात आगामी निवडणुकीमध्ये आघाडी होण्याचे संकेत वरिष्ठांनी दिले गेले. त्यावरुन पुन्हा जिह्यातील आघाडीचे बिनीचे शिलेदार काँग्रेस व राष्ट्रवादीचे इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. अजून 2019 च्या निवडणुकीला वेळ असून आतापासूनच विधानसभा गणात जोरदार तयारी सुरु झाली आहे. आठही विधानसभा मतदार संघात कोणाला जमेचे तर कोणाला वजाबाकीचे वातावरण आहे यावरुन राजकीय खलबत्ते सुरु झाली आहेत.

फलटणमध्ये नाईक-निंबाळकर घराण्यातच रंगणार कलगीतुरा

फलटण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता म्हणजे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याच विचाराचा उमेदवार हा विधानसभेला निवडून येतो. त्यांनी विधानसभेला आरक्षण कोणते पडते यावेळी त्यावरुन उमेदवार देतील, हे अजून ठरवायचे आहे. परंतु त्यांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेही आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी त्यांच्या फळीतील कार्यकर्ते इच्छुक झाले आहेत. जरी राष्ट्रवादीसाठी जागा दिली तरीही येथेही नाईक – निंबाळकर घराण्यातच कलगीतुरा रंगणार आहे.

खटाव-माणसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये भांडण

माण विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे या दोघा भावांमध्ये विळय़ा भोपळय़ाचे नाते बनले आहे. तशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाची ताकद या विधानसभा मतदार संघात आहे. राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेखर गोरे यांना तिकिट दिली गेली परंतु त्यांना निवडून आणण्यात राष्ट्रवादीची वरिष्ठ मंडळी कमी पडली. त्यामुळे आमदारकीला ते कसेही करुन उभे राहणार असल्याने येथेही जरी काँग्रेसला जागा सोडली तरीही शेखर गोरे हे निवडणूक लढवणार असल्याने दोन्ही काँग्रेसमध्येच वाद दिसणार आहे. त्याचबरोबर प्रभाकर देशमुख यांनीही आपली इच्छा व्यक्त केली असून त्यांनीही वॉटरकपच्या माध्यमातून तयारी सुरू केली आहे. तसेच भाजपामध्येही अनेकजण रेसमध्ये आहेत. त्यामुळे तेथेही गटतट निर्माण झाले आहेत.

कराड दक्षिणमध्ये काका-बाबा गटात पुन्हा राजकीय पोळी

कराड दक्षिणमध्ये 2014 च्या आमदारकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुरेपुर ताकद लावली अन् काँग्रेसचे माजी आमदार विलासराव उंडाळकर यांचे होणारे रेकॉर्ड थांबवले. अजूनही कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे प्राबल्य असले तरीही  दोन्ही गटात अजूनही राजकीय शीतयुद्ध सुरु आहे. त्यामुळे तेथे काँग्रेसलाच जागा दिली तरीही काँग्रेसच्या दोन्ही गटात पुन्हा आघाडीत बिघाडी होणार हे ठरलेलंच. भाजपाचे अतुल भोसले यांनीही चांगलीच साखर पेरणी केली आहे.

कराड उत्तरमध्ये काँग्रेसची गळचेपी

कराड उत्तरमध्ये जागा ही राष्ट्रवादीलाच देतील. सध्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांचाच गड आहे. काँग्रेसचे इच्छूक व निवडणूक लढवलेले धैर्यशील कदम यांची पुन्हा इच्छा असूनही जर आघाडी झाली तर गळचेपी होण्याची शक्यता आहे. भाजपाचे मनोज घोरपडे यांनी कसून तयारी सुरु केली आहे.

पाटणमध्ये सगळाच ख्योळ

पाटण विधानसभा मतदार संघात पक्ष बाजूलाच राहतात. येथे पाटणकर आणि देसाई गटाचे राजकारण चालते. सध्या राष्ट्रवादीमध्येही बरेचजण नाराज होवून ते आमदार शंभूराज देसाई यांच्या संपर्कात गेलेत तर देसाई यांच्या राजकारणावरुन व त्यांच्या बोलण्यावरुन अनेकजण नाराज होवून तटस्थ राहिले आहेत. काँग्रेस केवळ हिंदूराव पाटील यांच्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यामुळे सगळाच ख्योळ सुरु आहे.

वाईमध्ये आबा अन् दादा यांच्याकडे नजरा

2014 मध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढली गेली होती. परंतु आता जर आघाडी झाल्यास हा मतदार संघ राष्ट्रवादीलाच सोडावा लागणार आहे. मकरंद आबांनी हल्लाबोल यात्रेत चांगलेच रान तापवले आहे. काँग्रेसचे समजले जाणारे मदनदादा हल्ली शांत बनले आहेत. त्यांची भूमिकाच कार्यकर्त्यांना समजत नाही. काही कार्यकर्ते भाजपात गेलेत तर काही कार्यकर्ते अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे जर आघाडीत जागा वाटपात राष्ट्रवादीला तिकीट दिल्यास दादांची भूमिका काय याकडे नजरा असून खंडाळय़ाचे सतत बंडखोरीची भाषा करणारे नितीन भरगुडे-पाटील यांच्या हलत्या राजकारणावर चर्चा राहणार आहे.

सातारा-जावलीत राष्ट्रवादीलाच तिकीट

सातारा-जावली मतदार संघात काँग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे आघाडी झाल्यास तिकीट राष्ट्रवादीलाच द्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार हे आमदार शिवेंद्रराजे हेच असून त्यांनी आतापासून विधानसभा मतदार संघात चांगलीच पायाला भिंगरी लावली आहे. त्यांचे विरोधक समजले जाणारे भाजपाचे दीपक पवार हे मात्र शासकीय कार्यालयात अधिकाऱयांच्या केबीनमध्ये कामे करण्यात व्यस्त असतात.

कोरेगावातून बारामतीचा उमेदवाराची शक्यता

कोरेगाव हा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर वनचा मतदार संघ बनल्यासारखे आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांना मानणाऱया कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मतदार संघातून त्यांच्या चिरजीवांना संधी देण्याचीची चर्चा अलिकडच्या काळात रंगू लागली आहे. तसेच आमदार शशिकांत शिंदे यांच्याबाबतीत लोकसभा की राज्यसभा अजूनही निर्णय तळय़ातमळय़ात असाच आहे. शालिनीताईंच्या या मतदार संघात काँग्रेसचे अस्तित्व केवळ कोरेगावात किरण बर्गे यांच्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. भाजपा व सेनेमधून नुसतीच बिनकामाची मंडळींची बेरीज सुरु आहे.

Related posts: