|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पूर्ववैमनस्यातून साताऱयात युवकाचा खून

पूर्ववैमनस्यातून साताऱयात युवकाचा खून 

प्रतिनिधी/ सातारा

येथील मंगळवार पेठेत शनिवारी रात्री उशिरा दोन युवकांमध्ये पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणाचे पर्यावसन मारहाणीत झाले. त्या एका युवकाने लोखंडी पाईपने डोक्यात पाठीमागील बाजूस फटका मारल्याने व्यंकटपुरा पेठेतील संदीप रमेश भणगे हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारास दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना कळताच मंगळवार तसेच व्यकंटपुरा पेठेत एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनेचा छडा लावत याप्रकरणी व्यकंटपुरा पेठेतीलच प्रसाद प्रकाश कुलकर्णी यास अटक केली. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास संदीप रमेश भणगे (वय 35) रा. व्यकंटपुरा पेठ मंगळवार पेठेतील साईबझार या दुकानाजवळ थांबला होता. त्या ठिकाणी प्रसाद प्रकाश कुलकर्णी (वय 32) रा. व्यंकटपुरा पेठ हा आला. तेथे प्रसाद कुलकर्णी याने त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील 7 ते 8 जणांवर 2012 साली केलेली दरोडय़ाची केस मागे घेण्यास सांगितले. ही दरोडय़ाची केस सध्या सातारा कोर्टात सुरु असून ती संदीप भणगे याने केलेली होती. मात्र, संदीप भणगे याने केस मागे घेण्यास नकार दिला. यातून वाद वाढत गेला आणि प्रसाद कुलकर्णी याने हातातील लोखंडी पाईपने संदीप भणगे याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस जोराचा फटका मारला.

लोखंडी पाईपच्या मारामुळे संदीप भणगे गंभीर जखमी झाला. त्यावेळी प्रसाद कुलकर्णीने तेथून पळ काढला. प्रसाद कुलकर्णी हा गुंड प्रवृत्तीचा आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच भणगे याच्या कुटुबियांनी, मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, उपचारास दाखल करण्यापूर्वीच संदीपचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती कळताच सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व तपासाबाबत सूचना केल्या.

याबाबत संदीपचे वडील रमेश विठ्ठल भणगे (वय 65) रा. व्यंकटपुरा पेठ यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर संशयित आरोपी म्हणून प्रसाद प्रकाश कुलकर्णी याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी संदीप भणगे याच्या खून प्रकरणी त्यास अटक केली. दरम्यान, या घटनेमुळे मंगळवार पेठ व व्यकंटपुरा पेठेत खळबळ उडाली होती. दिवसभर येथील परिसरात तणावपूर्ण शांतता होती.  घडलेल्या घटनेची नागरिक दबक्या आवाजात चर्चा करत होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करत आहेत.

गतवर्षीही घडली होती खुनाची घटना

मंगळवार पेठ व व्यकंटपुरा पेठ तशी शांतच असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही पेठेत अशांतता निर्माण करणाऱया घटना अधून मधून घडत असतात. गतवर्षीही या परिसरात गुंड बोचरच्या खुनाची घटना घडली होती आणि आजदेखील भररस्त्यात खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत तसेच दोन्ही पेठेत पोलिसांची गस्त सुरु करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.