|Monday, June 17, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय गुंतवणूकदारांकडून खरेदीचा सपाटा

भारतीय गुंतवणूकदारांकडून खरेदीचा सपाटा 

बीएसईचा सेन्सेक्स 293, एनएसईचा निफ्टी 97 अंशाने मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

भांडवली बाजारात पुन्हा खरेदी परतल्याने बीएसईच्या सेन्सेक्सने पुन्हा 35 हजारचा टप्पा ओलांडला. कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर करण्यात येत असून त्यात वाढ आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून मिश्र संकेत मिळाले. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याचे ब्रोकर्सकडून सांगण्यात आले.

बीएसईचा सेन्सेकस 293 अंकाने वधारत 35,208 वर बंद झाला, तर एनएसईचा निफ्टी 97 अंकाने मजबूत होत 10,715 वर बंद झाला.

2014 नंतर प्रथमच कच्च्या तेलाच्या किमती उच्चांकावर पोहोचल्याने ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्री कायम आहे मात्र कंपन्यांच्या तिमाही उत्पन्नात वाढ होत असल्याने देशातील गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढत आहे, असे गिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख बाजार रणनीतिकार आनंद जेम्स यांनी सांगितले.

सेन्सेक्समध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 3.68 टक्के आणि ऍक्सिस बँक 2.82 टक्क्यांनी वधारले. तिमाही निकालापूर्वी आयसीआयसीआय बँकेचा समभाग 2.30 टक्क्यांनी मजबूत झाला. टाटा स्टील 2.52 टक्के, हिंदुस्थान युनि 1.91 टक्के, रिलायन्स 1.88 टक्के, ओएनजीसी, आयटीसी, एशियन पेन्ट्स, विप्रो 1.83-1.48 टक्क्यांनी मजबूत झाले.

डॉ. रेड्डीज लॅब, कोल इंडिया, टीसीएस, सन फार्मा, एचडीएफसी बँक, हीरो मोटो 1.75-0.27 टक्क्यांनी घसरले.

धातू निर्देशांक 1.68 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 1.64 टक्के, रिअल्टी 1.51 टक्के, ग्राहकोपयोगी वसतू 1.45 टक्के, पीएसयू 1.18 टक्के, इन्फ्रास्ट्रक्चर 1.13 टक्क्यांनी वधारले. आरोग्यसेवा आणि आयटी समभाग किरकोळ घसरले.

बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.56 टक्के आणि मिडकॅप निर्देशांक 0.55 टक्क्यांनी वधारले.

अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध, अमेरिकेतील रोजगार डेटा आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ करण्यात येणार असल्याने आशियाई बाजारात संमिश्र संकेत दिसून आले. हाँगकाँगचा हँगसँग निर्देशांक 0.22 टक्के आणि शांघाय बाजार 1.48 टक्क्यांनी वधारला. जपानचा निक्केई किरकोळ घसरला.