|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आण्विक करारावर ठाम राहणार जर्मनी, फ्रान्स

आण्विक करारावर ठाम राहणार जर्मनी, फ्रान्स 

ब्रिटनचा पाठिंबा  अमेरिका करारातून बाहेर पडण्याची शक्यता, इराणने दिला इशारा

वृत्तसंस्था/ बर्लिन

इराण आण्विक करारातून बाहेर पडण्याचा अमेरिकेने निर्णय घेतला तरीही आपला सहभाग कायम राहणार असल्याचे फ्रान्स आणि जर्मनीने म्हटले आहे. इराणवर नियंत्रणासाठी अमेरिकेने आण्विक करारातील सहभाग कायम ठेवावा, असे आवाहन ब्रिटनने केले.

मध्यपूर्वेत आपला प्रभाव मर्यादित करण्याच्या अमेरिकेच्या दबावाला जोरदार विरोध करणार असल्याचे इराणने जाहीर केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 मेपर्यंत आण्विक करारातील त्रुटी दूर न झाल्यास अमेरिका करारातून बाहेर असल्याची घोषणा केली आहे.

इराण आण्विक करारात सामील तीन युरोपीय देश फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी तो कायम राखण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे विधान फ्रान्सचे विदेशमंत्री ज्यां-वेस ली द्रियां यांनी केले. जर्मनी करारात कायम राहू इच्छितो, हा करार जगाला सुरक्षित करणारा असल्याचा दावा जर्मनीचे विदेशमंत्री हीको मास यांनी यावेळी केला.

ट्रम्प यांनी हा करार संपुष्टात आणू नये. या करारात निश्चितपणे त्रुटी आहेत, त्या दूर केल्या जाऊ शकतात असा मला विश्वास आहे. आण्विक कार्यक्रमावर करारांतर्गत नियंत्रणामुळे इराणच्या आक्रमक क्षेत्रीय वर्तनाला आवर घालण्यास मदत होईल असे ब्रिटनचे विदेशमंत्री बोरिस जॉन्सन यांनी म्हटले. जॉन्सन हे सध्या अमेरिकेच्या दौऱयावर आहेत.

इराण अणुबॉम्बची निर्मिती करत नाही आणि करणार देखील नसल्याचे आम्ही वारंवार सांगितलं आहे. इराणला कमजोर किंवा त्याचा जागतिक प्रभाव मर्यादित करण्याची अमेरिकेची इच्छा असल्यास आम्ही त्याला जोरदार विरोध करू. सर्व संभाव्य स्थितींसाठी आम्ही तयारी करत आहोत. अमेरिका या करारातून बाहेर पडल्यानंतर देखील इराणला दिलेली आश्वासने पाळली गेल्यास कराराबद्दल आम्ही प्रतिबद्ध राहू, अन्यथा इराण स्वतंत्र मार्ग चोखाळेल असे इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी म्हटले.