|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हसण्यासाठी जन्म आपुला

हसण्यासाठी जन्म आपुला 

हसायला कोणाला आवडत नाही? विनोदी पुस्तक, सिनेमा-नाटक, टीव्ही मालिका आपल्याला हसवण्याचे प्रयत्न करीत असतात. पण काही लोकांना वाचनाची आवड नसते. काहींना सिनेमा-नाटकात पैसे खर्च करण्याची सवड नसते. काही लोक घरबसल्या टीव्ही मालिका बघतात. पण हल्ली त्या मालिकांमध्ये विनोदाच्या नावाखाली पुरुष कलाकार साडी नेसून अचरट चाळे करतात आणि निर्माते त्यालाच विनोद म्हणतात. हसण्याच्या बाबतीत अशी सगळीकडून नाकेबंदी झाली तरी बिघडत नाही. आपले मायबाप पुढारी लोक आठवडय़ातून किमान तीनदा तरी एखादं अचरट आणि सनसनाटी विधान करून उभ्या देशाला हसवीत असतातच.

एकूणच या देशात हसवणाऱयांची कमतरता नाही. हसणारेच कमी पडतात. आपण नेहमी चर्चा ऐकतो विनोदी पुस्तके खपत नाहीत, सिनेमे-नाटके प्रेक्षकांच्या प्रतिसादाअभावी तोटय़ात चालली आहेत, किंवा चांगल्या विनोदी टीव्ही मालिकांना टीआरपीच्या अभावी प्रायोजक नाहीत, वगैरे. पुढाऱयांना मात्र अशी खंत नसते. ते विनोद करीत राहतात. जनता हसत राहते. तूर्तास जीएसटी द्यावा न लागणारी तेवढीच एक करमणूक उरली आहे नं. आणखीन एक मोफत हसवणारा घटक आहे तो म्हणजे व्हॉट्सअपवर येणारे सुविचारवजा संदेश. ते वाचून देखील खूप हसू येतं.  

हास्य मंडळ ऊर्फ लाफिंग क्लब हे काय प्रकरण आहे याची मला आधी कल्पना नव्हती. बागेत फिरायला जाताना नेहमी एका कोपऱयात उभे राहून जोरजोरात हसणारी माणसे दिसायची. पण त्यांचा आपापसात काही हास्यविनोद चालू असेल म्हणून मी दुर्लक्ष करायचो. एकदा कुतूहलाने त्या गटाजवळ जाऊन उभा राहिलो. मनात म्हटलं, ते लोक इतक्मया जोरात हसतात त्या अर्थी काहीतरी धमाल विनोद चालला असेल, तो ऐकायला मिळेल. पण तसं काही नव्हतं. समूहाचा प्रमुख इशारा देत होता आणि त्यानुसार सगळे हसत होते. मुंबईला शिवाजी पार्कनजीक एक लाफिंग क्लब मात्र निराळा दिसला. तिथं काही लोक आधी व्यायाम करतात आणि नंतर एखादा सभासद नवा कोरा विनोद सांगतो.

या हास्य मंडळ ऊर्फ लाफिंग क्लबबद्दल माझी काही तक्रार नव्हती आणि नाही. पण परवा माझ्या एका मित्रानं माझी खोडी काढली. माझ्या विनोदी लेखनावर अभिप्राय देताना तो म्हणाला, “लाफिंग क्लबमध्ये वाचून दाखव. छान प्रतिसाद मिळेल.’’

आता मला लेखनसंन्यास घ्यावासा वाटतोय.