|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंब्रा बायपास बंद, वाहतुकीचा चक्काजाम

मुंब्रा बायपास बंद, वाहतुकीचा चक्काजाम 

काम आजपासून सुरू : वाहतुकीत बदल, मुंबई- ठाण्यात दोन महिने राहणार वाहतूक कोंडी?

 

अनेक महिन्यापासून चर्चेत असलेला मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी मंगळवारी बंद करण्यात आला. वाहतूक नियोजनाच्या अभावाने दोनवेळा मुंब्रा बायपासचे काम लांबणीवर पडले होते. अखेर मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, चाकरमान्यांची दाणादाण उडाली आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी वाहतूक ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे ग्रामीण आणि पालघर भागातून वळवण्यात आल्याने वाहतुकीचा चक्काजाम तर संथ गतीने वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसले.

मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरुस्ती कामामुळे वाहतूक घोडबंदर, ऐरोली, शिळफाटा मार्गे वळवण्यात आली. पुढील दीड ते दोन महिने मुंब्रा बायपास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून प्रवाशांना याच पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. उरणमधील जेएनपीटी बंदरातून नाशिक आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहने मुंब्रा बायपास मार्गाचा वापर करतात. परंतु, या मार्गावरील अवजड वाहतूक आता दुपार आणि रात्रीच्या वेळेस ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे ग्रामीण आणि पालघर भागातून वळवण्यात येणार आहे. तसेच घोडबंदर मार्गावर दुपारी 12 ते 5 या वेळेतही नियंत्रित पद्धतीने अवजड वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभाग ठाणे पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी दिली. एकीकडे पावसाळय़ाच्या तोंडावरच या कामाला सुरुवात केल्याने हे काम किती झटपट आणि दर्जेदार होईल यावर प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे.

दोन महिन्यात काम संपविणार….

मुंब्रा बायपास कामाची निविदा प्रक्रिया जरी 6 महिन्याची असली तरी प्रत्यक्ष काम हे दीड ते दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल. यात सदर फ्लायओव्हरचे 6 स्लॅब नव्याने घडवून बसवण्यात येतील. तर संपूर्ण ब्रिजचे बॉल बेअरिंग देखील बदलण्यात येतील, अशी माहिती बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता आशा जठार यांनी दिली. या फ्लायओव्हरचे काम दिवसरात्र चालणार असून त्यासाठी तीन पाळय़ांमध्ये कर्मचारी आणि मशिनरी ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदरच्या रस्त्यावरून दिवसरात्र अवजड वाहतूक होत असल्याने हा रस्ता जास्त दिवस बंद ठेवता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुंब्रा बायपास मार्गाचा वापर करणाऱया जड-अवजड वाहनाच्या मार्गात बदल करून ऐरोली, आनंदनगर चेकनाका हे पर्यायी मार्ग म्हणून निवडण्यात आले आहेत. यापूर्वीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलनाक्यावर पिवळय़ा पट्टय़ाचा नियम लागू केला. मात्र, वाहतूक कोंडीनंतरही टोलवसुली सुरूच राहत असल्याने मनसे, भाजप युवा मोर्चा आदींनी आक्षेप नोंदवला.

मात्र, आता रस्त्यावर वाहतूक कोंडी पुन्हा टोल वसुलीसाठी नियमांचे उल्लंघन करीत होणारी टोलवसुलीकडे प्रकर्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे मत भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केले.