|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मंत्री विजय सरदेसाईने सासष्टीचा विकास गोठवूनच दाखवावा

मंत्री विजय सरदेसाईने सासष्टीचा विकास गोठवूनच दाखवावा 

प्रतिनिधी/ मडगाव

प्रादेशिक आराखडय़ाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी सासष्टी तालुक्यातील शहरी भाग वगळता इतर सर्व गावांतील विकास पुढच्या दहा वर्षांसाठी गोठवून ठेवण्याची तयारी असल्याचे विधान सोमवारी केले. मात्र, त्यांनी सासष्टीतील एका तरी गावाचा विकास गोठवून दाखवावा असे उघड आव्हान नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांनी काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले.

मंत्री विजय सरदेसाई यांच्या विरोधात मिकी पाशेको यांनी जोरदार आघाडी उघडली असून काल अगदी शेलक्या भाषेत त्यांच्यावर जोरदार टीका केली. या दोघांतील शाब्दीक युद्ध रंगणार असल्याचे संकेत देखील कालच मिळाले.

विजय सरदेसाई हे मंत्री होण्यापूर्वी गत विधानसभेत आमदार होते. त्यावेळी प्रत्येक गोष्टीवर ते राजकीय भांडवल करून भाजप सरकारवर टीका करायचे. विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी भाजप विरोधात केलेल्या भाषणाचे कित्येक व्हिडिओ व्हायरल झालेत. मात्र, त्याच विजय सरदेसाईने भाजपला पाठिंबा दिला शिवाय मंत्रीपद स्वीकारले. मंत्री झाल्यानंतर त्यांचा संयम ढाळला असल्याचा आरोप देखील मिकी पाशेको यांनी केला.

विजय सरदेसाई गेल्या विधानसभेत आमदार असताना, भाजपचे सरकार पाडण्यासाठी आपल्या पर्यंत ते पोहचले होते असा गौप्य स्फोट मिकी पाशेको यांनी केला. तेच विजय सरदेसाई, मिकी पाशेको कोण असा सवाल प्रसार माध्यमांशी करतात, तेव्हाच त्यांच्या पातळीचा अंदाज येतो असो टोमणा देखील यावेळी हाणला. आपण 15 वर्षे आमदार होतो, सरकारात मंत्री होतो, सासष्टीची जनता आपल्याला बऱया पैकी ओळखते. त्याच बरोबर गोव्यातील जनता. तरी सुद्धा मिकी पाशेको कोण असा सवाल उपस्थित करणारे कोणत्या लायकीचे असू शकतात हे स्पष्ट होत असल्याचे मत मांडले.

आपण एकटाच त्यांना भारी ठरणार

सद्या सरकारात मंत्री असल्याने विजय सरदेसाई यांची भाषा बदलली आहे. आज ते सासष्टीचा विकास गोठवण्याची भाषा बोलतात, त्यांना जर हिंम्मत असेल तर त्यांनी सासष्टीच्या एका तरी गावाचा विकास गोठवून दाखवावा, आपण एकटाच त्यांना भारी पडणार असल्याचा दावा देखील मिकींने केला.

गोव्यात एकूण 40 आमदार आहेत. या सर्व आमदारांना लोक चोर म्हणून उल्लेख करतात. आमदार खरेच चोर आहे का ? हे स्पष्ट होण्यासाठी सर्व आमदार व मंत्र्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी व्हावी व सत्य जनतेसमोर यायला पाहिजे. आपली सुद्धा चौकशी जरूर करावी, कुणालाच चौकशीतून वगळू नये. आमदार होण्यापूर्वी किती मालमत्ता होती व आमदार झाल्यानंतर किती मालमत्ता झाली. याचा तपशील उघड झाल्यास, राजकारण्यांची सत्य परिस्थिती जनतेसमोर येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

काही राजकारण्याची राजकारणात येण्यापूर्वी काय औकात होती व राजकारणात आल्यानंतर त्यांच्याकडे आलिशान गाडय़ा कशा काय आल्या हे देखील उघड व्हायला पाहिजे. मंत्री विजय सरदेसाई यांनी शेतीच्या बांधावरच घर बांधले याकडे देखील दुर्लक्ष करता येणार नाही असे मिकी पाशेको म्हणाले. गोव्यातील गोर गरीब जनतेकडे बघायला कुणालाच वेळ नाही. सर्व जण आपला स्वार्थ सांधण्यात गुंतल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Related posts: